तुमसर व मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
डॉ. हरेंद्र राहांगडाले, भाऊराव तुमसरे यांचे तहसीलदार यांना निवेदन सादर
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेले तुमसर व मोहाडी हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार तुमसर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना भंडारा जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे संचालक डॉ. हरेंद्र राहांगडाले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भाऊराव तुमसरे यांनी दिले आहे.
पावसाचा लहरीपणा व निसर्गाच्या प्रकोपात शेतकरी भरडल्या गेला आहे. खोडकिडा, गादमसी, मावा, तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी अशा विविध रोगाने शेतकऱ्याच्या धान पिकाला चांगलेच झोडपले आहे. तेलही गेले आणि तुपही गेले हाती आले धुपटणे अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी दुष्काळ जाहीर करणे गरजेचे होते. जरी दुष्काळ जाहीर झाला असला तरी भंडारा जिल्ह्यातून तुमसर व मोहाडी हे दोन्ही तालुके वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या मनात संताप खदखदू लागला आहे. शेतीचे पंचनामे करण्यात यावे अशीही मागणी होत आहे.
शेतकरी हा आधीच दारिद्र्य नारायणाचा अवतार म्हणून जगत आहे. शेतकऱ्यांना महागाईने चांगलेच झोडपले आहे. पेट्रोल, डिझेल, साहित्याच्या वाढत्या किंमती व खताचे दर गगनाला भिडले आहे. मजुराच्या मजुरीत वाढ झाली आहे. याकडे सुद्धा शासनाचे लक्ष वेधले जात आहे. तुमसर व मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, कृषी मंत्री, माजी पालकमंत्री परिणय फुके, तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजुभाऊ कारेमोरे, जिल्हाधिकारी, जिल्हा व तालुका कृषी अधिकारी यांना सुद्धा निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी डॉ. हरेंद्र राहांगडाले, भाऊराव तुमसरे, राजू माटे, मुकुंदा आगासे, वीरेंद्र रंगारी, धनराज चौधरी, राजकुमार चांदवार, अमित कुंजेवार, भगवान चांदवार व राकेश धार्मिक यांचा समावेश आहे.








