ग्रामीण भागात मंडईनिमित्त आले जत्रेचे स्वरूप
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भाऊबीजेच्या दिवसापासून मंडईचा उत्सव सुरू झाला असून शहरातील नागरिक ग्रामीण भागाकडे वळू लागली आहे. याप्रसंगी लोककळांचे प्रदर्शन मंडईमध्ये होत असते. रुपेरी-चंदेरी दुनियेच्या या लोककलांना चांगलाच फटका बसत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.
दिवाळीतील बलीप्रतिपदेचा दिवस संपताच भाऊबीजेच्या दिवसापासून मंडई उत्सवाला सुरुवात होतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेती हंगामाला नसरून या उत्सवाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खरिपाचे पीक हातात येते व याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा मंडई हा माध्यम आहे. वर्षभर शेतात राबणारा शेतकरी मंडईत अनेक प्रकारची खरेदी करतो, याशिवाय मंडईत मनोरंजनासाठी नाटक, तमाशा, खडीगंमत, दंढार, गोंधळ यासारख्या लोककलेचे आयोजन केले जाते. झाडीपट्टीची दंढार ही लोककला राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे. दंढार ही अनेक लोककलांची जननी मानली जाते. ग्रामीण भागात जेव्हा अन्य कुठलीही मनोरंजनाची साधने नव्हती, तेव्हा दंढारीची उत्पत्ती झाल्याचे बोलले जाते. रेडिओ, टीव्ही, सिनेमाघर ही मनोरंजनाची साधने आल्यापासून आता मात्र या लोककलांना अखेरची घरघर लागली आहे.
मंडई हा केवळ मनोरंजनाचा स्त्रोत नसून, लोकांसाठी नवीन नातेसंबंध जोडण्यासाठी आणि लग्न जुळविण्याचे देखील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मंडईनिमित्त जवळसच्या नातेवाईकाकडे जाऊन पाहुणचार घेण्याचा परंपरा आजही काही प्रमाणात सुरू असली तरी वाहतुकीची साधने, रस्ते यामुळे नातेवाईकाकडे रात्री मुक्काम करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे सुद्धा मंडईत सहभागी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
रात्री मुक्कामी असणारे पाहुणे मंडळी गावात आयोजित या लोककलांचा आस्वाद घेत असत. अनेक ठिकाणी उपवर मुला-मुर्लींचे विवाह ठरवण्यासाठी मंडई हे उत्कृष्ट माध्यम ठरत होते. काळानुरूप आता या गोष्टी कालबाह्य होत आहेत. ग्रामीण भागातील मंडई व त्यात प्रदर्शित होणाऱ्या लोककला यांचे आकर्षण कमी होत असल्याने प्रतिसाद कमी मिळत असला तरी मंडईची आयोजन मात्र सुरुच आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक गावातील मंडईची तिथी ठरलेली असते. भाऊबीजेचा दिवस व त्यानंतरच्या ठरलेल्या दिवशीच मंडईचे आयोजन केले जाते. ग्रामीण लोककलांची आवड दिवसेंदिवस कमी असली तरी या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची ‘कला’ जोपासण्यासाठी धडपड सुरु आहे.
भाऊबीजेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मंडईतील आमदंगल, तमाशा, संगीत व नौंकी नाटक या कार्यक्रमांचा परिसरातील नागरिक आस्वाद घेत आहेत. मंडईमुळे ग्रामीण भागातील उत्साह दिसून येतो. हवसे, नवसे व टवसे असे सर्व प्रकारचे युवक मंडईचा आस्वाद लुटतात. दुपारच्या वेळी असलेल्या दंढारीचा आनंदही घेतात. मंडईमध्ये असलेली गर्दी पाहता पाय मांडायलाही घद जागा मिळत नाही. प्रत्येक दुकानात लोकांची गर्दी, ही विशेष करून आढळते. शहरात दिसत असलेली गर्दी गावात दिसते. अनेक गावात जाताना चारचाकी वाहने सुद्धा रस्त्यावरून काढता येत नाही. अशीच मंडई नेहमी येत राहो, असेच हे दुकानदार म्हणत तर नसावेना.








