मंढईच्या आनंदपर्वावर वस्त्रदानाचा मायेचा हात!

वाकेश्वर येथे साडी, लुगडे व धोत्राचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

दै. लोकजन वृत्तसेवा वाकेश्वर :- गावाच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक जीवनाचा अभिन्न्य भाग असलेल्या मंढईच्या शुभपर्वाचे औचित्य साधून वाकेश्वर येथे गोंडाणे परिवाराच्या वतीने साडी, लुगडे व धोत्राचे वाटप करण्यात आले. उत्सवाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील इतर घटकांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलविण्याच्या उदात्त भावनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सरपंच लुहास गोंडाणे, देवेंद्र गोंडाणे व अरुणभाफ गोंडाणे या परिवाराच्या यांच्या सहयोगातून १५ लुगडे, ४५ साड्या व ३५ धोतर वाटण्यात आले.

या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता, मानुसकी आणि आपुलकीच्या नात्यांचे दर्शन घडले. ग्रामीण भागात मंढईला केवळ मनोरंजनाचे स्वरूप नसून त्याला सांस्कृतिक, सामाजिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. वर्षभराच्या धावपळीनंतर गावातील नागरिक एकत्र येतात. नातेवाईक, पाहुणे आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठींमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. गावाच्या परंपरा, लोककला आणि सामाजिक एकोपा जपणारा हा उत्सव प्रत्येकासाठी आनंदाची पर्वणी ठरतो. अशा आनंदाच्या पर्वावर समाजातील गरजू घटकांनाही उत्सवाचा आनंद घेता यावा, या भावनेतून गोंडाणे परिवाराने वस्त्रवाटपाचा उपक्रम हाती घेतला.

साडी, लुगडे आणि धोतर हे केवळ वस्त्र नसून ग्रामीण संस्कृतीत त्यांना आपुलकीच्या भेटीचे आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते. सणासुदीच्या काळात मिळालेली अशी भेट अनेकांच्या मनाला समाधान देणारी ठरते. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सामाजिक कार्य करताना प्रसिद्धीपेक्षा माणसांच्या चेहऱ्यावरील समाधान महत्त्वाचे असते, ही भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत उत्सव साजरे करताना सामाजिक दायित्वाचे भान जपणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आनंदाच्या प्रवाहात सामावून घेणे, गरजूना मदतीची হাত देणे आणि गावातील परस्पर स्नेहभाव वृद्धिंगत करणे हीच खऱ्या अर्थाने उत्सवाची सार्थकता आहे. गोंडाणे परिवाराने मंढईच्या निमित्ताने राबविलेला हा उपक्रम त्याच विचारानी प्रचिती देणारा ठरला.

उत्सवाच्या झगमगाटापेक्षा मानुषुकीचा प्रकाश मोठा असतो आणि भेटवस्तूच्या किमतीपेक्षा त्यामागील प्रेमाची भावना अनमोल असते, हा संदेश गोंडाणे परिवाराच्या या उपक्रमातून वाकेश्वरवासीयांना मिळाला. त्यांच्या या सामाजिक पुढाकाराचे गावात कौतुक होत आहे. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गजानन ठवकर, आनंदरावजी डरुफाळे, रमेश मस्के, राजू हलेमारे, रामभाऊ डहाके, सचिन लेंडारे, दिपाली काटेखाबे, रोशन गोंडाणे, विनोद गोंडाणे प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *