बावनथडीच्या पुराची गती मोजणारे केंद्रच गुंडाळले!

दै.लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- बावनथडी नदीच्या पाण्याच्या पातळीतील वाढते जलस्तर मोजण्यासाठी बपेरा गावात आंतरराज्यीय सीमेवर जलसंपत्ती विभाग नागपूरचे कार्यालय सुरू करण्यात आले. नदीच्या पात्रात केबल घालून जलस्तर मोजण्याचे प्रयत्न करण्यात आले. राज्य शासन आणि जलसंपदा विभागाला ही माहिती देणारे कार्यालय होते. आता हे कार्यालयच कुलूपबंद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत झुडपे वाढली आहेत. कार्यालय कुलूपबंद करण्यात आल्यानंतर जलसंपदा विभागाला आता माहिती दिली जात नाही. नेहमी कोरडे दिसणारे बावनथडी नदीचे पात्र पावसाळ्यात क्षणार्धात पुराची पातळी ओलांडत आहे. नदीच्या पात्रात उभे असताना कळायच्या आत पात्र तुडुंब भरले जात आहे. बावनथडी नदीच्या काठावर सीमावर्ती गावे आहेत. ही गावे पूरग्रस्त असून, दरवर्षी नदीच्या पुराचा फटका गावांना बसत आहे. घरे आणि शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. बावनथडी नदीच्या पाण्याचे बपेरा गावाच्या शेजारी वैनगंगा नदीला झालेला आहे. पावसाळ्यात वैनगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह बावनथडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला रोखून धरत आहे. पाण्याचा प्रवास थांबताच बावनथडी नदीचे पाणी बपेरा गावात शिरत आहे.

याशिवाय नद्यांच्या काठावरील गावात पुरांचे पाणी उग्र रूप धारण करीत आहे. यामुळे घरे आणिशेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. पावसाळ्यात बावनथडी नदीतील पाण्याची पातळीतील वाढते जलस्तर मोजण्यासाठी आंतरराज्यीय सीमेवर ३ एकरांत पाटबंधारे विभाग, जलसंपदा उपविभाग क्रमांक ४ नागपूरचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. नदीतील पाण्याचा जलस्तर, पर्जन्य मापक केंद्र आणि पाण्याच्या वाढत्या पातळीच्या संदर्भात माहिती देणारे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या वसाहतीत कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. दर तासाला घेण्यात आलेली माहिती सरकारला दिली जात असल्याने बावनथडी नदीच्या पुराची माहितीजलसंपदा आणि राज्य सरकारला प्राप्त होत होती. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्यालय कुलूपबंद करण्यात आले आहे. या वसाहतीत आता कुणी कर्मचारी वास्तव्य करीत नाहीत. नदीच्या काठावर पाण्याचे पातळीची मीटरने नोंद घेण्यासाठी खांब उभारण्यात आले आहे. याशिवाय बपेरा, महाराष्ट्र आणि मोवाड, मध्य प्रदेश, असे दोन गावांना जोडून नदीच्या पात्रातून केबल घालण्यात आले होते. ते केबल आता गायब झाले आहेत. मीटरने नोंद घेणारे खांब नदीच्या पात्रात कोसळले आहेत.