भाऊबीजेच्या दिवशी अपघातांची मालिका ; एक ठार, पाच जखमी

लाखनी, आंबाडी आणि चप्राड पहाडींजीक तीन वेगवेगळ्या घटना ; महामार्गावर भरधाव वाहनांचा कहर

भंडारा / लाखनी:- दिवाळीचा आनंद, भाऊबीजेचा उत्साह आणि माहेरच्या भेटीची ओढ असतानाच जिल्ह्यातील रस्त्यांवर अपघातांचे संकट ओढवले. गत २४ तासांत लाखनी, आंबाडी आणि चप्राड पहाडींजीक घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर पाच जन जखमी झाले. यात दोन महिलांचा समावेश असून काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. भरधाव कारची दुचाकीला धडक, कार-मोटरसायकलची टक्कर आणि मद्यधुंद अवस्थेतील युवकाने दुचाकीला मागून दिलेली धडक, अशी अपघातांची कारणे समोर आली आहेत. सणासुदीच्या काळात महामार्गावरील वाढती वाहतूक, वाहनांचा वेग प्रवाशांच्या जिवावर बेतत असल्याचे दिसून आले आहे.

आंबाडीजवळ कार-मोटरसायकलची धडक

भंडारा : पवनी मार्गावरील आंबाडी येथे १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजताच्या सुमारास कार आणि मोटरसायकलची धडक होऊन दोन युवक जखमी झाले. आदित्य काशीराम पाचोडे (२३, रा. सिल्ली) आणि स्वप्निल नामदेव गजɓे (२८, रा. केसेलेवाडा, ता. मोहाडी) हे एमएच ३५ क्यू ७०८४ क्रमांकाच्या दुचाकीने पवनीकडून भंडार्‍याकडे येत होते. यावेळी भंडार्‍याकडून पवनीकडे जाणाऱ्या एमएच ३४ ए ९८९६ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दोन्ही घटनांच्या अपघाताची माहिती जगद्गुरु नरेद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तालुक्यातील गडेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर १० नोव्हेंबर रोजी रात्री ७:२५ वाजताच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात संजय केशव बढवाईक (५८, रा. गडेगाव) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी वंदना संजय बढवाईक (५०) जखमी झाल्या. भंडार्‍याकडून लाखनीकडे जाणाऱ्या चारचाकी क्रमांक (एमएच ३१ ईयू ३४५५) चा चालक वकार युसुफ अब्दुल सिद्दीकी (२८, रा. दुर्ग, छत्तीसगड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोहवा रामकृष्ण बावनकुळे यांनी गुन्हा नोंदविला असून पोउनि अतुल तराळे तपास करीत आहेत.

माहेरी जाताना अपघात; महिला गंभीर

लाखांदूर : भाऊबीजेनिमित्त भावाला ओवाळण्यासाठी पतीसोबत माहेरि जात असलेल्या महिलेच्या दुचाकीला मद्यधुंद युवकाने मागून धडक दिली. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लाखांदूर-वडसा राष्ट्रीय महामार्गावरील चप्राड पहाडींजीक ही घटना घडली. रोशन देवानंद पचारे (२५, रा. सोनी) आणि गीता राजकुमार जांभुलकर (४७, रा. मडेघाट) हे दोघे गंभीर जखमी झाले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *