भंडाऱ्यात ६३ प्रकल्पांत पाणीसाठ्यात मोठी घट

रब्बी पिके व पिण्याच्या पाण्याची चिंता

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांसह मामा तलावांमधील पाण्याची पातळी खालावल्याने रब्बी हंगामातील सिंचन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि मत्स्य व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक तलावांमध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याचे चिंता व्यक्त होत आहे.

लघु प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हिवरा प्रकल्पात केवळ २.०१ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच काळात हा साठा १६.०७ टक्के होता. आंबागड प्रकल्पात १०.७१ टक्के, तर पय्नारखारी प्रकल्पात ११.२० टक्के पाणी उपलब्ध आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे ९०.९० आणि ६५.६८ टक्के जलसाठा होता. या तुलनेत यंदा पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होते.

डोंगरगाव येथील मामा तलावात केवळ १२.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तलावात ७८.६४ टक्के पाणी होते. कुरमुडा येथे १५.३८ टक्के, नागठाणा येथे १८.१४ टक्के, डोंगरला येथे २२.२१ टक्के, कारली येथे २६.२१ टक्के, डोडमझरी येथे २९.८० टक्के, रावणवाडी येथे २२.२९ टक्के आणि निहारवानी येथे २२.९३ टक्के जलसाठा आहे. लोभी मामा तलावात २८.६१ टक्के, इंदोरा येथे ३७.५२ टक्के, तर झरी येथे ३०.१० टक्के पाणी शिल्लक आहे.

सिंचनाचे नियोजन व पाणी व्यवस्थापनाचे आव्हान

जलसाठ्यातील घसरणीमुळे आगामी रब्बी हंगामासाठी सिंचनाचे नियोजन, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि मत्स्य व्यवसायाचे संरक्षण या बाबींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

मत्स्य व्यवसायावर परिणामाची शक्यता

तलावातील पाण्याची पातळी वेगाने कमी झाल्याने मत्स्य व्यवसायासमोरही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पाण्याचे प्रमाण घटल्यास तापमान वाढणे, विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी कमी होणे आणि माशांच्या वाढीवर परिणाम होणे अशा समस्या उद्भवू शकतात. परिणामी, माशांचे उत्पादन घटण्यासोबतच मच्छिमारांच्या उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो. तलाव जानेवारीपर्यंत आटण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने मत्स्य व्यवसायिकांची चिंता वाढली आहे.

३१ लघु प्रकल्पांत ५४ टक्केच जलसाठा

जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ५४.०२ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच तारखेला हे प्रमाण ८९.९३ टक्के होते. गतवर्षी १८ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते; यंदा कवलेवाडा आणि वाकल हे दोनच प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

जिल्ह्यातील २८ मामा तलावांमध्ये एकत्रित ६१ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी हे प्रमाण ६३.०१ टक्के होते. गतवर्षी २७ मामा तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते; यंदा केसलवाडा हा एकमेव मामा तलाव शंभर टक्के भरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *