कोट्यवधींचा खर्च, नाईट लँडिंगची सुविधा; तरीही बिरसी विमानतालावर विमानसेवेचे ‘टेकऑफ’ रखडले!
चार विमान कंपन्यांना प्रस्ताव; प्रवासी സേवेसाठी खासदार प्रफुल्ल पटेल स्वतः पुढाकार घेणार, गोंदिया-मध्य प्रदेश-छत्तीसगडमधील प्रवाशांच्या आशा पुन्हा पल्लवित
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- कोट्यवधी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधांनी सुसज्ज करण्यात आलेले बिरसी विमानतळ, विमानांच्या रात्रीच्या उड्डाणासाठी नाईट लँडिंगची व्यवस्था आणि प्रवासासाठी उत्सुक असलेला मोठा प्रवासीवर्ग… असे अनुकूल वातावरण असतानाही बिरसी विमानतालावरून प्रवासी विमानांचे उड्डाण बंद असणे ही केवळ प्रशासनिक अपयशाची बाब नसून विकासाच्या दृष्टीने एक शोकांतिकाच ठरत आहे. विमानसेवा सुरू होण्याच्या अपेक्षेने गोंदियासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रवासी प्रतीक्षेत असताना आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविल्याने पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे.
गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळावरून वर्षभरापूर्वी स्टार एअर आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी प्रवासी सेवा प्रारंभ केला होता. गोंदिया-हैदराबाद आणि गोंदिया-इंदाूर या दोन मार्गांवर विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. दररोज सुमारे सव्वाशे प्रवासी या सेवांचा लाभ घेत होते. हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक, तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेलगत असलेले गोंदियाचे भौगोलिक स्थान लक्षात घेता या विमानसेवेला मोठी व्यावसायिक संधी होती.
मात्र, वर्षभर नियमित सेवा दिल्यानंतर संबंधित विमान कंपन्यांनी देखभाल-दुरुस्तीचे कारण पुढे करीत सुरुवातीला तीन महिन्यांसाठी सेवा स्थगन केली, त्यानंतर या कंपन्यांनी येथून गाशा गुंडाळला. परिणामी, मागील सहा महिन्यांपासून बिरसी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा पूर्णपणे बंद आहे. कोट्यवधींची गुंतवणूक, अत्याधुनिक यंत्रणा, धावपट्टी आणि नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध असतानाही विमानतळ प्रवासी सेवेशिवाय पडून असल्याने या सुविधांच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चार कंपन्यांना प्रस्ताव, प्रतिसादाची प्रतीक्षा
बिरसी विमानतळावरून प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून आतापर्यंत चार विमान कंपन्यांना प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सोमवार ९ नोव्हेंबर रोजी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दोन-तीन खासगी विमान कंपन्यांशी स्वतः चर्चा करून प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे ग्वाही दिली. विमानतळ आहे, सुविधा आहेत; मग विमानसेवा का नाही? हा प्रश्न आता गोंदियातील नागरिकांसह सीमावर्ती भागातील प्रवाशांना सातवत आहे. विमानतळ उभारणी आणि सुविधांवर झालेला कोट्यवधीचा खर्च प्रत्यक्ष प्रवासी सेवेतून सार्थ ठरणे आवश्यक आहे. केवळ विमानतळाची भव्य इमारत आणि आधुनिक यंत्रणा म्हणजे विकास नव्हे, तर तेथून नियमित विमानांचे उड्डाण करणे महत्वाचे आहे. खासदारांच्या पुढाकारातून विमान कंपन्यांचा प्रतिसाद मिलता का आणि बिरसी विमानतळाचे रखडलेले ‘टेकऑफ’ पुन्हा कधी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








