कुडवा जैवविविधता उद्यानाचे दरवाजे नागरिकांसाठी बंद!

विकासकामातील कथित अनियमिततेवरून वाद पेटला

आरटीआयमधून दीड कोटींच्या देयकांचा मुद्दा समोर, प्रवेशबंदीमुळे वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- शहरलगतच्या कुडवा येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यानातील विकासकामांवरून सुरू असलेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. विकासकामातील कथित अनियमितता आणि आर्थिक व्यवहाराबाबत माहिती अधिकारामधून (आरटीआय) धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर आता या उद्यानाचे दरवाजे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त होत असून, उद्यानातील प्रवेशबंदीमागील नेमके कारण काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कुडवा येथील हे जैवविविधता उद्यान नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालविता यावा, जैवविधेतेची ओळख व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. मात्र, सध्या या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर काही व्यक्ती तैनात करून नागरिकांना आत जाण्यापासून रोखले जात असल्याचे माहिती समोर आली आहे. एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, प्रवेशबंदीबाबत कोणतीही अधिकृत सूचना फलकही प्रवेशद्वारावर दिसत नसल्याची बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांना प्रवेश रोखण्याचे आदेश नेमके कोणी दिले? प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या व्यक्ती वन विभागाच्या आहेत की कंत्राटदाराच्या? त्यांची नियुक्ती कोणत्या आदेशानुसार करण्यात आली? प्रवेशबंदीचा लेखी आदेश आहे का? असल्यास तो कोणत्या नियमांचा आधाराने काढण्यात आला? या प्रश्नांवर वन विभागाकडून अध्याप स्पष्टता आलेली नाही.

दरम्यान, माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रानुसार, उद्यानातील १६ विकासकामे पूर्ण होण्यापूर्वी सुमारे दीड कोटी रुपयांची देयके अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही कामे कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आली; मात्र प्रत्यक्षात ती अपूर्ण असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. जुलै महिन्यात कामे पूर्ण झाल्याचे दाखवून देयके काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारीनंतर आणि जिल्हाधिकारी कार्यालयनातील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर प्रत्यक्ष कामांना गती मिळाल्याचे सांगण्यात येते.

तक्रारदार अमरसिंह राजपूत यांचा आरोप

तक्रारदार अमरसिंह राजपूत यांनी जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर उद्यानातील कामांना अचानक वेग आला आणि त्यानंतर प्रवेशद्वार बंद करून नागरिकांना रोखण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. सार्वजनिक निधीतून उभारलेले उद्यान नागरिकांसाठी खुले असावे, प्रवेशबंदीचे कारण आणि त्यासंबंधीचा लेखी आदेश वन विभागाने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *