काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधातील प्रचार खोटा

मत चोरी नाही तर त्यांच्या मेंदू चोरी झाली आहे

भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांचा आरोप

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- संविधानाने निर्माण केलेल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्थांच्या विरोधात निगेटिव्ह वातावरण निर्माण करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात निर्माण केलेल्या संस्थांवर आरोप करून लोकांमध्ये नकारात्मकता पसरवून लोकशाहीवरील विश्वास संपवण्याचा प्रयल सुरू आहे. ही ‘मत चोरी नसून त्यांच्या मेंदू ची चोरी’ असल्याचा आरोपही भंडारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चैतन्य उमाळकर, जिल्हा महामंत्री मयूर बिसने, शहर अध्यक्ष सचिन कुंंभलकर उपस्थित होते.

आशू गोंडाणे म्हणाले, एका वृत्तपत्राने बातमी छापली आणि त्या बातमीच्या आधारावर संपूर्ण देशात निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखविर सिंग सिंधू, डॉ. विवेक जोशी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमच्यात कोणताही मतभेद नाही, निवडणूक आयोगाने घेतलेले सर्व निर्णय सर्व सहमतीने घेतले आहेत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा खोटा प्रचार पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

राहुल गांधी प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक भाषणात संविधानाचे पुस्तक दाखवतात, पण त्यांचा मूळ उद्देश ते संविधानाला मानत नाही. हा देश चायना सारख्या कम्युनिस्ट आणि अति डाव्या विचारसरणीकडे नेण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि काँग्रेसचा दिसत आहे. एका वृत्तपत्राने छापले की एसआयआरची जी प्रक्रिया देशात आणि महाराष्ट्रात सुरू आहे, त्यात तीन सदस्य आहेत आणि त्यापैकी एक विरुद्ध दोन असा मतभेद आहे.

फॉर्म नंबर ६ च्या विरोधात मत मांडतही प्रक्रिया पुढे राबवली, हा प्रचार पूर्णपणे चुकीचा आहे. फॉर्म नंबर ६ चा मसुदा कसा असावा हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिले आहे, तरीही विरोधी पक्ष त्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वातावरण निर्माण करीत आहेत.

जेव्हा जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा पराभव झाला की ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर दोष दिला जातो. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी निवडून आली, हिमाचल, कर्नाटक, तेलंगणामध्ये काँग्रेस निवडून आली, तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? काँग्रेस जिंकली की ईव्हीएम चांगले आणि हरली की ईव्हीएम खराब, हा दुटप्पीपणा आहे. निवडणूक आयोगाने १५ दिवसांचे आव्हान दिले होते की ईव्हीएम हॅक करून दाखवा, पण एकही राजकीय पक्ष हॅक करू शकला नाही. २०१४ पासून ईव्हीएमचा मुद्दा चालला नाही, म्हणून आता मत चोरीचा मुद्दा काँग्रेसने उचलला आहे. पण ही मत चोरी नसून त्यांच्या मेंदूची चोरी झाली आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९५६ मध्ये भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीला उभे होते, तेव्हा याच काँग्रेसने त्यांचा पराभव करण्यासाठी पूर्ण यंत्रणा आणि आर्थिक शक्ती लावली होती. कारण बुद्धिमान व्यक्तीला लोकसभेत जाऊ द्यायचे नव्हते.

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर झाला आणि ज्या १५ विधानसभांमध्ये सर्वात जास्त मतदान कमी झाले, त्या १५ ही ठिकाणी टीएमसीचे आमदार निवडून आले. त्यामुळे एसआयआरमळे भाजप निवडून आला हा प्रचार खोटा आहे. बंगालमध्ये जंगलराज तयार झाले होते, त्याला कंटाळून लोकांनी परिवर्तन म्हणून भाजपला बहुमताने निवडून दिले, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *