१० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक व शिपायावर गुन्हा दाखल; दोघे फरार

भंडारा :- केस लहान करायची असेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करणाऱ्या भंडारा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एका पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपींचे नाव रमेश संपतराव खाडे, वय ३८, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भंडारा (वर्ग-२), मूळ रा. बावची, ता. वाळवा, जि. सांगली व रवीकुमार बाबुराव आडे, वय ३८, पोलीस शिपाई, (वर्ग-३), पोलीस स्टेशन भंडारा, ह.मु. नेहरू वार्ड, मोहाडी, मूळ रा. पेडगाव, जि. हिंगोली असे आहे.
या प्रकरणातील २६ वर्षीय तक्रारदार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन भंडारा येथे प्राप्त तक्रारीवरून आरोपींनी “केस लहान करायची असेल तर १० हजार रुपये लागतील, तुझ्यावर छोटी केस करतो” अशी बतावणी करून १० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे प्राप्त झाली होती. त्याचं दिवशी पोलीस स्टेशन भंडारा येथे पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यात आरोपी शिपाई आडे यांनी तक्रारदाराशी बोलणी करून, आरोपी एपीआय खाडे यांच्या मोबाईलवर फोन लावून तक्रारदाराचे बोलणे करून दिले आणि १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. आरोपी क्र. १ खाडे यांनी आरोपी क्र. २ आडे यांना लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती, मात्र दोन्ही आरोपींना कारवाईचा संशय आल्याने ते तक्रारदाराला भेटले नाहीत. मात्र पडताळणीवेळी १० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे अपराध क्रमांक २०३९/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दि. ३०/०९/२०२६ रोजी सायंकाळी ६.२१ वाजता दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध लागताच अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर, माधुरी बावीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, तपास अधिकारी नितेश देशमुख, पथकातील पोहवा मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, पोलीस शिपाई विष्णू वरठी, सुमेध रामटेके यांनी केली.
नागरिकांनी भ्रष्टाचाराविषयी तक्रार असल्यास ला.प्र.वि. कार्यालय, सिव्हील लाईन, भंडारा, दूरध्वनी ०७१८४-२५२६६१, व्हॉट्सअॅप ८४३२२६१०६४, टोल फ्री १०६४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









