कत्लीसाठी नेणाऱ्या ६ गोवंशाची सुटका

दोन पिकअप सह ११ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- सितेपारवरून रोहा-बोरी-मुंडरी मार्गे अवैधरित्या गोवंश जनावरे कत्लखान्यात नेत असल्याच्या गोपनीय माहितीवरून करडी पोलिसांनी सापळा रचून दोन बोलेरो पिकअप वाहनातून ६ गोवंश जनावरांची सुटका केली असून दोन पिकअप वाहने व तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपीना अटक केली आहे. या कारवाईत एकूण ११ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पो.स्टे. करडी येथे फिर्यादी हवालदार सुनील इस्तारी वरकडे यांच्या तक्रारीवरून आरोपी राहुल सहसराम बोंदरे, वय ३३ वर्ष, रा. रोहा (चालक – गाडी क्र. एम. एच. ३५ के. ए. ४४८६), संदिप शिवाजी मोहुर्ते वय ४० वर्ष, रा. निलज (खु.) (चालक – गाडी क्र. एम. एच. ३६ ए. ए. ३१५६) व सोनू कुरेशी, रा. कामठी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोहवा वरकडे व पोशि मेश्राम हे खाजगी मोटर सायकलने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सितेपारवरून रोहा येथे बोरी मुंडरी मार्गे पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप डाला गाडीत गोवंश जनावरेकोंबून कत्लखान्यात नेत आहे.

या माहितीवरून पोलिसांनी पंच प्रफुल उत्तम रोटके, रुपेश अनिल कांबळे दोन्ही रा. कान्हळगाव आणि जयंत तेजगिर ब्रहमनाथी रा. बोरी यांना सोबत घेऊन मौजा मुंडरी (बु.) ते बोरी टी पॉईंटवर सायंकाली ५.०० वाजता सापळा लावला होता. या प्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपीना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

थानेदार गोरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुनील वरकडे, पोशि समीर मेश्राम यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *