जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केली पालदोंगरी, जांब व पोहरा परिसरातील भातपिकांची प्रत्यक्ष पाहणी

शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या

नुकसानीचे अचूक सर्व्हेक्षण व पंचनामे करण्याचे निर्देश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पावसातील प्रदीर्घ खंडामुळे भातपिंकावर निर्माण झालेला ताण तसेच काही भागात तुडतुडा व खोडकिडीचा झालेला प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. आंधळगाव मंडळातील पालदोंगरी व जांब परिसरातील शेताना भेट देत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या.

आंधळगाव येथील शेतकरी शंकर मेश्राम यांच्या शेताची जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर जांब येथील शेतकरी दिवाकर बोरकर यांच्या शेतालाही भेट देऊन भातपिकाची पाहणी केली. यावेळी भातपिकावर झालेला तुडतुडा व खोडकिडीचा प्रादुर्भाव, तसेच पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम याबाबत त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पिकांची सद्यस्थिती, कीड नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याबाबतच्या अडचणी मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी लाखाणी तालुक्यातील पोहरा येथे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी क्षेत्रीय भेटीदरम्यान शेतकऱ्यांससोबत चर्चा केली आणि कीड रोग पीक परिस्थिती आढावा घेतला. यावेळी तहसीलदार शीतल घाबटे, तालुका कृषी अधिकारी नितीन राठोड, लाखाणीचे मंडळ अधिकारी प्रशांत भोयर, उप कृषी अधिकारी २ जागेश्वर नाकाडे, लाखोरीच्या सहा. कृषी अधिकारी कु. पपीता टिचकुले, पोहराच्या सहा. कृषी अधिकारी कु. नंदिनी बोरकर, प्रगतशील शेतकरी मुकेश मते, योगराज आंबाडे, गंगाधर अर्जुनकर, गिरीश नगरकर व इतर महिला पुरुष शेतकरी उपस्थित होते.

शेतकसांना शासनामानुसार आवश्यक ती मदत मिळण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय बागडे, के. बी. लांजेवार, तलाठी विनोद भावे तसेच संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे अचूक सर्व्हेक्षण करावे. आवश्यकतानुसार नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *