सहयोग सहकारी पत संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकी, गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ सभासदांचा गौरव
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- नागपूर विभागातील अग्रगण्य पतसंस्था सहयोग सहकारी पत संस्था मर्या., तुमसरची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक पूज्य सिंधी धर्मशाला, तुमसर येथे संस्थेचे अध्यक्ष मो. तारिकजी कुरेशी यांच्या अध्यक्षखाली तसेच संस्थेचे सभासद व माजी खासदार मा. श्री. मधुकरजी कुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
दीपप्रज्वलनाने सभेची सुरवात झाली. यावेळी संस्थेच्या दिवंगत सभासदाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे संचालक प्रभाकर सिंगनजुडे यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला. या अहवालास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मो. तारिकजी कुरेशी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून संस्थेच्या ३७ वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला. सन २०२५-
२६ या आर्थिक वर्षात संस्थेने रु. ६७.४० लाखांचा निव्वळ नफा अर्जित केला असून सभासदांना ६ टक्के लाभांश देण्याची घोषणा मो. तारिक कुरेशी यांनी केली. या आर्थिक वर्षात संस्थेच्या
ठेवींमध्ये १०.९८ टक्के वाढ होऊन रु. ८९.९१ कोटी, भागभांडवल रु. ४.१७ कोटी झाले असून संस्थेने आर्थिक वर्षात रु. ६६.७५ कोटींचे कर्ज
वितरण केले आहे. संस्थेची ही आर्थिक वाटचाल सभासदांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि सातत्यपूर्ण कार्याची प्रेरणादायी पावती ठरली.
३७ वर्षांची विश्वासाची वाटचाल, आर्थिक प्रगतीसोबत शिक्षणाला प्रोत्साहन आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देणारी कार्यपद्धती यामुळे सहयोग सहकारी पत संस्था ही केवळ आर्थिक संस्था न राहता विश्वास, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी केंद्र म्हणून आपली वाटचाल पुढे नेत असल्याचे या वार्षिक सभेतून अधोरेखित झाले.
सभेचे संचालन संस्थेचे संचालक डॉ. युवराजजी जमईवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष कैलाश पडोळे यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक रमेश निखाडे, दामोधर सोनवाने, विजय अनवानी, डॉ. अनुप कोरडे, चंद्रकुमार फुलवाधवा, राशिद शेख, ॲड. विजय पारधी, सौ. मालती आगाशे, सौ. लक्ष्मी इळपाचे, सौ. किरण अग्रवाल, सभासद दिनेशजी अग्रवाल, ललित थानधराटे यांच्यासह ३५० सभासद उपस्थित होते.








