दुष्काळग्रस्त यादीत तुमसर-मोहाडीचा समावेश करा

अन्यथा रस्त्यावर उतरणार | आमदार राजू कारेमोरे यांचा इशारा

 

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, साकोली आणि लाखनी या चार तालुक्यांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सत्ता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वगळलेल्या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करणार असून, आवश्यकता भासल्यास शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावरही उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. मात्र यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, साकोली व लाखनी या तालुक्यांना वगळण्यात आले आहे. शासनाने दुष्काळग्रस्त तालुके निश्चित करण्यासाठी ७५ टक्के पर्जन्यमानाचा शासकीय निकष लावला आहे. त्यामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे धरणे, जलाशय कमी भरले आहेत. शासकीय आकडेवारीनुसार तुमसर तालुक्यात ७५.५५ टक्के व मोहाडी तालुक्यात ८१.९३ टक्के पाऊस पडल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात पाऊस कमी पडला असतानाही शासकीय आकडेवारीत पर्जन्यमान अधिक दाखविण्यात आले आहे का? असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांचा समावेश यादीत झालेला नाही.

यावर्षी शासनानेच एल निनो मुळे पाऊस कमी पडेल अशी सूचना राज्यात व जिल्ह्याच्या ठिकाणी केली होती. प्रभावामुळे पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाली असून, मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडला आहे. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत परिसरातील धरणे व जलाशयांमधील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी आहे.

पावसातील खंडामुळे आणि दमदार पाऊस न झाल्यामुळे धान पिकाची रोवणीदेखील उशिरा झाली आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने धानाची स्थिती समाधानकारक नसून, बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता कडाकरपा, तुडतुडा, खोडकिडा यांसारखे रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी हवालदिल झाला असून, जिवाचे रान करून उभे केलेले पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र उत्पादनात मोठी घट होणार आहे. अशा परिस्थितीत केवळ पर्जन्यमानाचा निकषावर निर्णय न घेता प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. झालेला अन्याय दूर करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी करणार आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे. कालही मी शेतकऱ्यांच्या पाठीशी होतो, आजही आहे आणि उद्याही त्यांच्या हक्कासाठी ठामपणे उभा राहणार आहे, असे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *