दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तुमसर तहसील कार्यालयासमोर आंदोलन
स्वराज्य युवा एकता फाउंडेशनने केली शासन निर्णयाची केली होळी
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- तुमसर व मोहाडी तालुक्यात पावसाच्या मोठ्या खंडामुळे निर्माण झालेली गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता, दोन्ही तालुके तात्काळ ‘दुष्काळग्रस्त’ घोषित करावेत या मागणीसाठी स्वराज्य युवा एकता फाउंडेशन तुमसर च्या वतीने तुमसर तहसील कार्यालयासमोर शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवत शासन निर्णयाची होळी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार उपेश अंबादे यांना दुष्काळ घोषित करण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
यावर्षी खरीप हंगामात ऐन मोक्याच्या काळात पावसाने मारलेली दांडी आणि पडलेल्या मोठ्या खंडामुळे भात (धान) पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांना ओलावा न मिळाल्याने शेतातील पिके करपून गेली असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. असे असतानाही शासनाकडून तुमसर व मोहाडी तालुक्याचा दुष्काळसदृश अथवा ट्रिगर-१ च्या यादीत समावेश न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच संतापाचा उद्रेक म्हणून स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या नेतृत्वात शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत शासन निर्णय जाळून तीव्र निषेध व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सलमान पठाण, हर्ष कठाने, उपसरपंच अशोक जगणाक, उमेश सहारे, रुपेश परतेती, बिनिश वाघमारे, बाळा सयाम, अमित देशभ्रतार, गुलाब वरखडे, तेजराम परतेती, लिखण गहाणे, शुभम रहांगडाले, अमोल देवघडे, ज्ञानेश्वर वासनिक, राजकुमार नेताम, प्रेमलाल गहाणे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमसर व मोहाडी तालुक्यातील दुष्काळाची भीषण वास्तवता लक्षात घेऊन तात्काळ दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना पीक विमा, आर्थिक मदत व महसुली सूट देण्यात यावी; अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.








