आंदोलन करण्यापूर्वीच घरातून अटक; ही लोकशाहीची हत्या

 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरेकर यांचा आरोप

 

दै.लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- एस.आय.आर. प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नावांबाबत होत असलेल्या कथित फेरफारांच्या निषेधार्थ तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनापूर्वी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरेकर यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन केले आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरेकर यांनी प्रतिक्रिया देताना, ‘मला झालेली अटक ही लोकशाहीची हत्या आहे. लोकशाहीमध्ये आपल्या मागण्यांसाठी शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मला घरातून ताब्यात घेणे हा लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या अधिकारांवर घाला आहे,’ असे म्हटले.

ते पुढे म्हणाले की, ‘मतदार हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. मतदार यादीत पात्र मतदारांची नावे सुरक्षित राहणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. एस.आय.आर. प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची निवडणूक आयोगाने स्पष्ट उत्तरे द्यावीत.’

काँग्रेसच्या निवेदनात एस.आय.आर. प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदार यादीतील बदल, नावे वगळण्याची प्रक्रिया तसेच निवडणूक आयोगाच्या आय.टी. प्रणालीच्या केंद्रीकरणाबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

निवेदनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर आक्षेप नोंदवत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एस.आय.आर. प्रक्रियेतील मतदार यादीतील बदलांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनात मुकुंद साखरेकर, प्रमोद तितीरमारे, जय डोंगरे, जयश्री बोरकर, मोहन पंचभाई, पवन मस्के, मनोज बनसोड, रक्षित मेश्राम, रमेश पारधी, प्यारेलाल वाघमारे, राजेश हटवार, प्रदीप बुराडे, आशिष पात्रे, बालू ठवकर, आकाश बोंद्रे, सोनू कोटवाणी, अय्युब पटेल, हितेश लांजेवार, वैभव मेंढे, मंगेश हुमणे, धनराज साठवणे, सदानंद धारगावे, सुभाष आजबले, प्रवीण थुलकर, सुदेश वैद्य, केशव शेंडे, धनराज शेंडे, घनश्याम भांडारकर, आशिष शिवणकर, गजानन बादशाह, पृथ्वी तांडेकर, नरेंद्र साकोरे, उमाकांत राऊत, रामदास पडोळे, संदेश श्यामकुवर, महेश कोराम, श्रीकांत येरपुडे, अजय गोरेकर, जनार्दन निंबादै, अक्षत नांदधने, धर्मेंद्र नंदंधने, माणिक ब्राह्मणकर, सुरेश खंगार, शैलेश पडोळे, अवंती राऊत, मनोज देशमुख, मोहम्मद अली खान, नम्रता बागडे, वैशाली भोगे, पौर्णिमा गजभिये, मीरा उरकुडकर, मनोहर उरकुडकर, सुरेखा जनबंधू, नाहीद परवेज, शाहिद अली, मीना जिभकाटे, मिलिंद सिंगाडे, प्रकाश देशमुख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *