जवाहर नवोदयच्या कारभारावर पालकांचा संताप; नवोदयला आश्रमशाळा करणाऱ्या प्राचार्यांच्या बदलीची मागणी

खासदार प्रशांत पडोळे यांच्या भेटीत पालकांनी दिले निवेदन; विद्यार्थ्यांनी मांडल्या व्यथा; सुविधांच्या अभावाचे गाऱ्हाणे

दै.लोकजन वृत्तसेवा

गोंदिया :- दर्जादार शिक्षण, शिस्त आणि निवासी शिक्षणपद्धतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयातील कथित प्रशासकीय अनागोंदीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. शिक्षकांची कमतरता, भोजनाचा दर्जा, आरोग्य सुविधा, वीज व पाणीपुरवठ्यासह विविध समस्यांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी २७ सप्टेंबर रोजी आयोजित शिक्षक-पालक सभेदरम्यान खासदार प्रशांत पडोळे यांनी विद्यालयाला आकस्मिक भेट दिल्यानंतर पालकांच्या नाराजीला जणू वाटच मिळाली.

सभेत पालकांनी विद्यालयातील विविध समस्यांचा पाढाच खासदारांसमोर वाचला. प्राचार्यांकडून पालक व विद्यार्थ्यांशी तुसडेपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही खासदारांशी संवाद साधताना आपल्या अडचणी मांडल्या. त्यामुळे विद्यालयातील वातावरणाचा प्रश्न केवळ सुविधांपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणाशीही संबंधित असल्याचे चित्र समोर आले.

शिक्षकांच्या कमतरतेमुळे शैक्षणिक नुकसान?

नववी आणि दहावी या महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यांवर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि माहिती-तंत्रज्ञान विषयांसाठी पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध नसल्याची तक्रार पालकांनी केली. परिणामी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला. मेसमधील भोजनाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे सांगताना दुधात मोठ्या प्रमाणात पाणी मिसळले जात असल्याचाही आरोप पालकांनी केला.

विद्यालय परिसरातील स्वच्छता, छतामधून होणारी पाण्याची गळती, वीजपुरवठ्याच्या अडचणी, बंद असलेले जनरेटर, डॉक्टरांची अनुपलब्धता तसेच आजारी विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारीही पुढे आल्या. कपडे धुणे व इस्त्री, केशकर्तन, शुद्ध व गरम पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित सेवांचे कंत्राट रखडल्याचेही पालकांनी निदर्शनास आणले.

चौकशी करून कारवाईचे निर्देश

विद्यालयाची पाहणी आणि विद्यार्थी-पालकांशी संवाद साधल्यानंतर खासदार पडोळे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश दिले. संगणक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी खुली करणे, भोजनाचा दर्जा सुधारणे तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय वाढवून शैक्षणिक वातावरण सुधारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

दरम्यान, प्राचार्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य देवाजी कापगते, उपप्राचार्य जुमडे यांच्यासह शेकडो पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *