दुष्काळग्रस्त यादीत मोहाडी, तुमसर, लाखनी व साकोलीचा समावेश करा

शेतकरी व लोकप्रतिनिधींची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- भंडारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करताना मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली तालुक्यांना वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वगळलेल्या तालुक्यांचाही तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केली आहे.

राज्य सरकारने भंडारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करताना भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांचा समावेश केला, मात्र त्याच जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली या चार तालुक्यांना वगळण्यात आले आहे. एकाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असा भेदभाव का करण्यात आला? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

चारही तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाअभावी पिकांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. अनेक ठिकाणी धानाची पिके करपून आणि गळून जात आहेत. काही ठिकाणी किडीच्या प्रादुर्भावामुळे हातातोंडाशी आलेला घासही धोक्यात आला आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित पाऊस, पिकाची स्थिती आणि उत्पादनावर अवलंबून असते. मात्र सरकारच्या निर्णयामुळे एका तालुक्यातील शेतकऱ्याला दुष्काळी मदत मिळणार आणि दुसऱ्या तालुक्यातील त्याच परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला वंचित राहावे लागणार आहे. ही केवळ प्रशासकीय चूक नसून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भावना आहे.

सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी वापरलेले निकष, तालुकानिहाय निर्णयाचा आधार आणि वगळलेल्या तालुक्यांमध्ये केलेल्या पाहणीचा स्पष्ट खुलासा करावा. मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली तालुक्यांची प्रत्यक्ष पाहणी करून फेरआढावा घ्यावा व पात्र सर्व तालुक्यांचा समावेश करावा, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांना न्याय द्या, वगळलेल्या तालुक्यांचा समावेश करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *