जिल्ह्यातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या कामांना गती देणार
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- जिल्ह्यातील रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच आरोग्य सुविधांच्या बांधकामांना गती देऊन प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. प्रशांत पडोळे, आ. परिणय फुके, आ. अविनाश ब्राम्हणकर, आ. नाना पटोले, आ. राजू कारेमोरे, गोंदियाचे आ. विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी सावन कुमार, नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी माने, कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, गोंदिया येथील कार्यकारी अभियंता बी. डी. रामटेके, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रगतीपथावरील तसे च प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधीची मागणी बैठकीत करण्यात आली.
जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या पुलांची पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीत सध्या कोणताही पूल धोकादायक अथवा पुनर्बांधणीसाठी आवश्यक नसल्याचे आढाव्यात स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत आरोग्य विभागाशी संबंधित बांधकामांची आढावा घेण्यात आला. भंडारा येथील १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे २५.२५ कोटी रुपयांचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच साकोली उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता ५० वरून १०० खाटांपर्यंत वाढविण्याचे ६१.२३ कोटी रुपयांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
नाबार्डअंतर्गत मंजूर २९ गोदाम बांधकामांपैकी १६ कामे पूर्ण करून संबंधितडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. मंजूर १५२ तलाठी कार्यालयांपैकी ४६ कार्यालयांची कामे पूर्ण झाली असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत.
जांब-मोहाडी-रोहा-मुंडरी रस्त्यावरील वैनगंगा नदीवरील मोठा पुलाचे काम प्रगती पथावर असून लाखांदूर प्रशासकीय इमारत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रशासकीय इमारत, भंडारा येथील व्हीआयपी विश्रामगृहाचे विस्तारीकरण तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मोहाडी, तुमसर आणि साकोली येथे उपविभागीय कार्यालये व विश्रामगृहे उभारण्याचे प्रस्तावित आहे. कारधा-खामारी-मांडवी-खडकी रस्त्यावरील लहान पुलासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. तसेच सर्व जिल्ह्यातील ओव्हरब्रिजिंग पुलांच्या पुनर्बांधणीची कामे नाबार्ड व केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.








