बोदलकसा जलाशयाच्या पाळीला भगदड; धानिकांवर संकटाचे सावट! तिरोडा तालुक्यात पाण्याचा विसर्ग सुरू
शेतकऱ्यांची चिंता वाढली, जिल्हाधिकारी व आमदारांकडून पाहणी; खबदारीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके पाचारण
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाच्या पाळीला अंशतः भगदड पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने लगतच्या शेतामध्ये पाणी शिरण्याची आणि शेकडो एकरांमधील उभ्या धानिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऐन धानपीक हंगामात घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासनाची यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कामाला लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थलळी रवाना झाले. तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले आणि जिल्हाधिकारी मदार पत्की यांनीही जलाशयास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थलळी लक्ष ठेवून आहेत. भगदड वाढू नये आणि संभाव्य नुकसान टाळता यावे, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
बोदलकसा जलाशयाची क्षमता ०.५५ टीएमसी असून, जलाशय लहान असल्याने मोठ्या धोक्याची शक्यता नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यास शेतजमिनी आणि उभ्या पिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाळीची स्थिती, विसर्गाचा प्रमाण आणि संभाव्य बाधित क्षेत्र याबाबत प्रशासनाच्या पुढील उपाययोजनांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
खबरदारीसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने परिसरातील नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. खबदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) प्रत्येकी एक पथक बोलावण्यात आले आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार परिस्थिती नियंत्रणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलाशयाच्या नेहरासमोरील भागातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाणी नेहरातूनच वाहत आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसून परिस्थिती सामान्य आहे. प्रशासकीय यंत्रणा आवश्यक खबरदारी घेत असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
धानिकांच्या नुकसानाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
सध्या धानपीक काढणीच्या हंगामाला सुरवात होत असताना जलाशयाच्या पाळीला पडलेल्या भगदडामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. शेतामध्ये पाणी शिरल्यास उभ्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग नियंत्रित ठेवणे, पाळीची दुरुस्ती करणे आणि बाधित होऊ शकणाऱ्या शेतजमिनींचे संरक्षण करणे ही प्रशासनासमोरील तातडीची आव्हाने आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा प्रशासनाचा दाव्याबरोबरच प्रत्यक्ष नुकसान टाळण्यासाठीच्या उपाययोजनांकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे








