मोहाडीच्या चोंडेश्वरी मातेच्या दरबारात भक्तांचा महासागर जागृत मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून अलॉट गर्दी
जिब्राईल शेख
मोहाडी (दें. लोकजन): नवसाला पावणारी आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहाडीच्या स्वयंभू माता चोंडेश्वरी मंदिरात नवरारौत्सवाची धूम सुरू आहे. पहाटेच्या आरतीपासूनच दर्शनासाठी भाविकांची अलॉट गर्दी होत असून, श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणानं मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. मोहाडीसह दूरदूरच्या गावांमधून हजारो भाविक माता चोंडेश्वरीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. दहा दिवसांच्या उत्सवामुळे मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने सजली असून, संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
चार वेदांच्या शक्तीतून मातेचे अवतरण झाल्याची आख्यायिका!
मोहाडीचे माता चोंडेश्वरी देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने मातेच्या चरणी प्रार्थना केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढते. स्थानिक ज्येष्ठांच्या कथनानुसार, अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यज्ञासाठी आणलेली आहुती सामग्री संपल्यानंतर तिथे ठेवलेल्या चारही वेदांची पाने एकएक करून यज्ञकुंडात अर्पण करण्यात आली. चार वेदांच्या शक्तीतून मातेचे अवतरण झाले आणि मातेने यज्ञकुंडातून आपले मस्तक वर काढून यज्ञकर्त्यांची मनोकामना पूर्ण केली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
चार वेदांच्या प्रभावातून देवीचे आगमन झाल्यामुळे पूर्वी तिला ‘चौडेश्वरी’ असे नाव देण्यात आले होते. कालांतराने त्याचे ‘चोंडेश्वरी’ असे नामकरण झाल्याचे सांगितले जाते. मातेचे केवळ मस्तक जमिनीच्या वर दिसत असून, संपूर्ण शरीर जमिनीखाली असल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे.
उत्सवाच्या नियोजनासाठी स्वतंत्र समिती
नवरात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी मंदिर समितीने पूजा, आरती व प्रसाद वितरण, देणगी संकलन, प्रसिद्धी व प्रसारण, स्वागत व तक्रार निवारण तसेच सुरक्षा समितींची स्थापना केली आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष बाळू बारई, उपाध्यक्ष एकानंद समरीत, सचिव गजानन गायधने, कोषाध्यक्ष उमाशंकर बारई, सहसचिव हर्षल गायधने तसेच सदस्य अशोक कारंजकर, हितेश साठवणे, युवराज बारई आणि गिरधर मोटघरे उत्सवाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. मातेच्या दर्शनासाठी वाढणारी भाविकांची गर्दी, मंदिरातील धार्मिक विधी आणि परिसरात सजलेली दुकाने यामुळे मोहाडीमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मंदिर परिसराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळाली असून, मंदिरामोरील खुल्या जागेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. विविध बांधकामामुळे मंदिर परिसराचे रूप पालटत आहे.








