शारदीय नवरात्रोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा

*पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचे आवाहन

*ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा:- शारदीय नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले.

स्थानिक पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित जातीय सलोखा व शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा, सहायक जिल्हाधिकारी साई किरण नंदाला, तहसीलदार भंडारा माकोडे तसेच, पोलीस उप अधीक्षक गृह सचिन पवार, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड ठाणेदार स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी ठाणेदार पो.स्टे. भंडारा, पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी ठाणेदार पो.स्टे. कारधा यांच्यासह जिल्ह्यातील शांतता समितीचे पदाधिकारी, विविध धर्माचे व समाजाचे प्रतिनिधी, पोलीस पाटील, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध विभागांचे प्रमुख व भंडारा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश मंडळांचा गौरव

गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून पोलीस प्रशासनाला उत्तम सहकार्य करणाऱ्या जिल्ह्यातील गणेश मंडळांना पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्सव काळात मंडळांनी प्रशासनाशी समन्वय राखून सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवून ठेवावी, असेही आवाहन करण्यात आले. महिला सुरक्षा, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे तसेच बेदरकार वाहन चालविण्याच्या धोक्यांविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात सुमारे ८०० ठिकाणी जनजागृतीपर बॅनर्स लावण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून उत्सव सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावळी करण्यात आले.

अफवांवर विश्वास ठेवू नका

सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा व अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही संदेशाची शहानिशा केल्याशिवाय तो पुढे पाठवू नये. आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

नवरात्रोत्सवादरम्यान गरबा व दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करताना आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असून, न्यायालयाचे निर्देश आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गोत्सवही डीजेमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *