अखेर सरपंच तुरकर यांच्या प्रयत्नाला यश
सिहोराला स्वतंत्र गावठाण फिडर वीज वितरण कंपनीने घेतला निर्णय
दै. लोकजन वृत्तसेवा
सिहोरा :- अखेर सरपंच रंजू तुरकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. हरदोली (सि) गावठाण फिडर मधून सिहोरा फिडर वगळून सिहोरा गावासाठी स्वतंत्र गावठाण फिडरच्या उभारणीला सुरुवात करण्यात आल्याने ग्रामपंचायत सिहोराच्या सरपंचा रंजू तुरकर यांनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी शाखा तुमसरचे स्वागत केले आहे.
व्यापाराच्या दृष्टीने सिहोरा हे महत्त्वाचे केंद्र बिंदू ठरले आहे. या गावाला ४० ते ४५ गावे जोडण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक सिहोरा येथे पोटाची खडगी भरण्याकरिता येतात. येथे पीठ व भात गिरण्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्या भात व पीठ गिरण्या वेळेवर सुरू असाव्यात बारबार वीज पुरवठा खंडित राहू नये तसेच शेतकरी, शाळेचे विद्यार्थी व शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्र बंद राहू नये यासाठी ग्रामपंचायत सिहोराच्या सरपंचा रंजू तुरकर यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शाखा तुमसर यांच्याशी १६ जून रोजी पत्रव्यवहार करून मागणी केली होती.
हरदोली (सि) या गावठाण फिडरवर अंदाजे १५ ते १६ गावे जोडण्यात आलेली आहेत. त्याच फिडरवर सिहोरा गावाचा सुद्धा समावेश आहे. नैसर्गिक आपत्ती व इतर कारणाने हरदोली फिडर बंद झाल्यास त्याचा फटका सिहोरा गावावर पडत होता. सिहोरा ही व्यापार नगरी आहे या व्यापार नगरीचा वीज पुरवठा बारंबार खंडित होऊ नये ही बाब लक्षात घेता हरदोली (सि) गावठाण फिडर वरून सिहोरा गावठाण फिडर वेगळा करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सिहोराच्या सरपंचा रंजू तुरकर यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शाखा तुमसर यांच्याकडे उचलून धरली होती.
या मागणीची तडकड फदकी दखल घेण्यात आली व आवश्यक त्या ठिकाणी वीज खांब उभे करण्यात आले. औपचारिकता पूर्ण झालेली आहे. लवकरच सिहोरा गावठाण फिडर हा स्वतंत्र रीतीने सुरू होणार असल्याने बारंबार वीज पुरवठा खंडित होणार नाही असे वीज वितरण कंपनीचे ज्युनियर इंजिनियर प्रदीप शर्मा यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.








