‘एक गाव – एक दुर्गा’ संकल्पनेतून गावाचा सामूहिक सहभाग

पालोरा येथील नवरात्रोत्सवाचे छतीसव्या वर्षात पदार्पण

धार्मिकतेसोबत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड

दै. लोकजन वृत्तसेवा

करडी / पालोरा:- मोहाडी तालुक्यातील पालोरा गावात सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाकडून यंदा छतीसव्या वर्षी नवरात्र उत्सव साजरा होत आहे. यंदा मंडळाने नऊ दुर्गा मूर्ती साकारली आहे. या नवरात्रोत्सवात गावात उत्साहाचे, श्रद्धेचे आणि एकोप्याचे वातावरण दिसून येत आहे.

सकाळ-संध्याकाळ देवीची आरती, भजन आणि दांडिया-गरबा यात लहानांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत सर्व जण सामील होत आहेत. गावकऱ्यांनी ‘एक गाव – एक दुर्गा’ या उपक्रमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले आहे. त्यामुळे कुठलाही भेदभाव न ठेवता संपूर्ण गाव उत्सवात सामील होत आहे.

या उत्सवातून महिलांना स्वतःची कला आणि क्षमता दाखवण्यासाठी मंच मिळाला आहे. महिला भजन, नृत्य आणि सांस्कृतिक, दांडीया नृत्य सादरीकरणात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. यामुळे महिलांना गावाच्या कार्यक्रमांत सक्रिय भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे.

सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून गावातील युवकांनी नियोजन, आयोजन आणि कार्यक्रमांच्या व्यवस्थापनात मोठा वाटा उचलला आहे. सजावट, पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर, स्वच्छता याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले जात आहे.

मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाची सांगता दरवर्षी पारंपरिक पद्धतीने केली जाते. देवीचे विसर्जन गावकरी सामूहिकरित्या पारंपरिक पद्धतीने भजन करत, मंगल वातावरणात पार पाडतात. या वेळी महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. तबला, पेटी व टाळ्यांच्या गजरात, ‘जय माता दी’च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून निघते. श्रद्धा आणि संस्कृती जपतानाच गावाच्या एकोप्याचा हा क्षण सर्वांना भावतो. यंदाही हीच परंपरा कायम ठेवत उत्सवाची सांगता भजन-कीर्तनाच्या वातावरणात होणार असल्याचे सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पालोराच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम

मंडळाने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, आनंद मेळा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञानाधारित विचारसरणी यावर, कीर्तन, जादूच्या कार्यक्रमातून मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येतात. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमांत बालक-कन्यांचा सहभाग दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *