तुमसर रोड रेलवे स्थानकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी
सुधाकर कारेमोरे यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेल्या तुमसर रोड रेलवे स्थानकाला वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे यांनी केली आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना उद्देशून निवेदन देण्यात आले असून, तहसीलदार, तुमसर यांच्यामार्फत हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात तसेच मराठी माणसांच्या हक्कांसाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याची स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तुमसर रोड रेलवे स्थानक हे भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचे रेलवे स्थानक असून, या परिसराला व्यापारी आणि वाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्व आहे. तुमसर तालुक्यातील मंगनीज खाणी, तांदळाची मोठी बाजारपेठ तसेच बालाघाटाच्या दिशेने जाणारा रेल्वेमार्ग यामुळे या स्थानकाचे महत्व वाढले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेतही या स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.
या स्थानकाचा लाभ स्थानिक नागरिकांसह विविध राज्यांतून प्रवास करणारे प्रवासी, व्यापारी आणि कामगार घेत असतात. त्यामुळे या स्थानकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होण्याबरोबरच तुमसर शहर आणि भंडारा जिल्ह्याला एक वेगळी ऐतिहासिक ओळख प्राप्त होईल, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या मागणीचा सकारात्मक विचार करून स्थानकाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पारधी, तालुकाप्रमुख ईश्वर भोयर, शहरप्रमुख प्रवीण गुमा, सत्यनारायण कामथे, राजेश कांबळे, महिपाल वहिले, राजकुमार गायकवाड, संतोष बोरकर तसेच तुमसर तालुका व शहरातील शिवसैनिकांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला आहे.








