सारिका चंदू बैसेशंकर लाखनी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध

दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी :- लाखनी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी २८ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सारिका चंदू बैसेशंकर यांची नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी केवळ एकाच उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने मतदान घेण्याची आवश्यकता भासली नाही.

ही निवडणूक प्रक्रिया साकोलीच्या उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीमती स्वाती देसाई यांच्या देखरेखीखाली पार पडली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा सहायक पीठासीन अधिकारी आशीष घोडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

लाखनी नगरपंचायतीचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. माजी नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर तसेच त्यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

बिनविरोध निवडीनंतर समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लाखनी शहराच्या विकासाला अधिक चालना मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

विशेष सभेला विपुल बबन कांबळे, कांता रविंद्र निर्वाण, राजेश उद्दवराव निंबेकर, महेश आसाराम आकरे, सारिका चंदू बैसेशंकर, लता रमेश रोडे, प्रदीप पुरुषोत्तम तीतीरमारे, प्रेरणा धनु व्यास, निशा संदीप मोहनकर, संदीप दिगंबर भांडारकर, ज्योती राजू निखाडे, अश्विन अरुण धरममारे, सविता निलेश सोनवणे, भूपेंद्र अनिल धरममारे आणि सचिन रंजीत भैसारे उपस्थित होते.

सारिका बैसेशंकर यांच्या बिनविरोध निवडीने लाखनी नगरपंचायतीला नवे नेतृत्व मिळाले असून, आता शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लागण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *