पत्नीला वाचविण्यासाठी पतीची कालव्यात उडी; दोघांचाही बुडून मृत्यू
कोरंभी येथील घटना; नागपूरहून आले होते स्वगावी
पवनी :- भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोरंभी येथे रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पती-पत्नीचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. शेतातून घरी परतताना पायावरील चिखल धुण्यासाठी कालव्याच्या पायऱ्यांवर उतरलेल्या पत्नीचा अचानक पाय घसरून ती खोल पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी पतीनेही कालव्यात उडी घेतली; मात्र पाण्याच्या खोली आणि प्रवाहामुळे दोघांनाही जीव गमवावा लागला. या घटनेमुळे कोरंभी गावावर शोककळा पसरली आहे. स्वप्निल अशोक बनकर (२९) आणि त्यांची पत्नी प्रज्ञा स्वप्निल बनकर अशी मृतकांची नावे आहेत. हे दाम्पत्य मूळचे कोरंभी येथील रहिवासी असून रोजगारानिमित्त नागपूर येथे वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी आले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास हे दाम्पत्य शेतात गेले होते. शेतातून परतताना महादेव देवस्थान मार्गावरील कालव्याच्या पायऱ्यांवर पाय धुण्यासाठी ते उतरले. याच वेळी प्रज्ञा यांचा अचानक पाय घसरला आणि त्या खोल पाण्यात पडल्या. पत्नी पाण्यात बुडत असल्याचे पाहून स्वप्निल यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचविण्यासाठी कालव्यात उडी घेतली. मात्र, कालव्यात चार मीटरपेक्षा अधिक खोलीचे पाणी आणि वेगवान प्रवाह असल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही. परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्यातील खोल पाणी, वेगवान प्रवाह आणि रात्रीचा अंधार यामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या.
गोताखोरांच्या मदतीने दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. पवनीचे पो. नि. प्रवीण डांगे यांनी कालव्यात चार मीटरपेक्षा अधिक पाणी असल्याने तसेच अंधारामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचे सांगितले. एकाच दुर्घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे कोरंभी गावात हळहळ व्यक्त होत आहे.








