नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ; वीकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- पावसाळ्यात निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असताना नवेगावबांधचे रूप अधिकच खुलले आहे. विशाल जलाशय, सभोवतालच्या हिरव्यागार टेकड्या, दाट जंगल आणि आल्हाददायक वातावरण यामुळे नवेगावबांध पर्यटनस्थळ सध्या पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण ठरत आहे. वीकेंड तसेच सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची अक्षरशः तोबा गर्दी होत असून, जिल्ह्यासह जवळील विविध भागांतून तसेच शेजारील राज्यांतूनही पर्यटक दाखल होत आहेत.

अजूर्नी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानालगत असलेला हा जलाशय सुमारे तीन हजार एकर परिसरात विस्तारलेला असून त्याचा घेर जवळपास २९ किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. चारही बाजूनी डोंगररांगा आणि घनदाट वनराईने वेढलेला हा परिसर पावसाळ्यात निसर्गचित्रासारखा भासतो. त्यामुळे छायाचित्रण, निसर्गभ्रमंती आणि निवांत वेळ घालवण्यासाठी पर्यटकांची येथे पसंती वाढत आहे.

नौकाविहाराची पर्यटकांना भुरळ
नवेगावबांधचे प्रमुख आकर्षण म्हणजे नौकाविहार. मोटरबोट, स्पीडबोट, स्कूटरबोट आणि पेंडल बोट अशा विविध पर्यायांमुळे जलविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. बालचमूंसाठी विविध झुले, जंपर्स, रॉकेट इंजेक्टर, जिपलाईन यांसारखी मनोरंजनाची साधनेही उपलब्ध आहेत. हिल्टॉप गार्डन आणि ॲडव्हेंचर पार्कमुळे या पर्यटनस्थळाच्या आकर्षणणात भर पडली आहे.

पर्यटकांच्या मुक्कामासाठी हॉलिडे होम्स, संजय कुटी तसेच एमटीडीसीची निवासव्यवस्थाही उपलब्ध आहे. उद्यानातील उपाहारगृहात भोजन व नाश्त्याची सुविधाही मिळते. त्यामुळे कुटुंबसह पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच नागपूर-रायपूर महामार्गाशीही या परिसराचा संपर्क असल्याने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी पोहोचणे तुलनेने सुलभ ठरते.

वाहतुकीमुळे पर्यटनाला नवी चालना
नवेगावबांध हे गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावरील देवलगाव स्थानканаपासून जवळ आहे. या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांचा ओघ दिवसाेंदिवस वाढत आहे. सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील शाळांची शैक्षणिक सहल सह तब्बल १० ते १५ हजार पर्यंत पर्यटक येथे येत असल्याचे सांगितले जाते.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधतेमुळे या भागाच्या पर्यटनाला बळ मिळत आहे. ‘वन, जल आणि वन्यजीव यांचा सुरेख संगम असलेल्या नवेगावबांधचा नियोजनबद्ध विकास झाल्यास येथे नैसर्गिक पायवाटा, स्काय टॉवर आणि जैवविविधता उद्यानासारखे प्रकल्प उभारता येतील. प्रशासनाने समन्वयाने काम केल्यास या पर्यटनस्थळाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळू शकते,’ असे नवेगावबांध फाउंडेशनचे सचिव रामदास बोरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *