शिक्षक भरतीच्या लढायाला मोठे यश; भंडाराला ३१४ शिक्षक मिळाले
प्रार्यमिकचे ३४१, माध्यमिकचे ५३ शिक्षक पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त
शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे रिक्त पदांचा प्रश्न घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याला प्राथमिक विभागातील ३४१ आणि माध्यमिक विभागातील ५३ असे एकूण ३१४ शिक्षक मिळाले आहेत. नव्याने नियुक्त झालेले हे शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रूजू होणार असल्याने शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती नरेश ईश्वरकर यांनी शिक्षक भरतीच्या प्रशासनासाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्ह्यातील शिक्षकांचे रिक्त पदांचा प्रश्न त्यांनी वेळोवेळी शासनाच्या दरबारात मांडला. शिक्षक नसलेल्या शाळांची वस्तुस्थिती प्रशासन आणि शासनाच्या निदर्शनास आणून देत तातडीने शिक्षक भरती करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती.
शिक्षक भरतीसाठी भंडारा जिल्ह्यात भव्य जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या आंदोलनात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिक्षक भरतीची मागणी लावून धरली होती. शिक्षक नसल्यामुळे आपल्या शिक्षणावर होणारे परिणाम विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मांडले. त्यामुळे हा लढा केवळ जनप्रतिनिधी किंवा शिक्षकांचा न राहता विद्यार्थ्यांचाही लढा बनला होता.
एवढ्याचवर न थांबता शिक्षक भरतीचा प्रश्न सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनीही शिक्षक भरतीचा मुद्दा संसदेत उपस्थित करून या प्रश्नाकडे राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले होते. शिक्षकांच्या मागणीचे घोषणावाक्य असलेला कुर्टा परिधान करून त्यांनी संसदेत प्रवेश करत या प्रश्नाकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष वेधले होते.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. काही शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या कालावधीपासून रिक्त होती. परिणामी विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक मार्गदर्शन मिळण्यात अडथळे निर्माण झाले होते. शिक्षकांच्या कमतरतेमुळे सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांनाच बसत असल्याने आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही ‘आम्हाला शिक्षक मिळालेच पाहिजेत’ अशी भूमिका ठामपणे मांडली होती.
आता ३१४ शिक्षकांची नियुक्ती झाल्याने या परिस्थितीत मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे. नव्याने नियुक्त शिक्षक शाळांमध्ये रूजू झाल्यानंतर शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नियमित आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
‘शिक्षक भरतीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाला मिळालेले हे यश असून, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे,’ अशी भावना सभापती नरेश ईश्वरकर यांनी व्यक्त केली. नव्याने नियुक्त झालेले शिक्षक लवकरात लवकर शाळांमध्ये रूजू झाल्यास शिक्षकांविना असलेल्या किंवा शिक्षकांची कमतरता भासत असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आंदोलनात लोकप्रतिनिधींपासून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी आवाज उठवला आणि त्या सामूहिक संघर्षाला आता ३१४ शिक्षकांच्या नियुक्तीच्या रूपाने यश मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी हा निश्चितच दिलासादायक आणि महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.








