अखेर तो गुराखी सुखरूप घरी परतला

दै. लोकजन वृत्तसेवा
सिहोरा :- सिहोरा व गोबरवाही पोलीस स्टेशनच्या सिमेवर असलेल्या गुडरी येथील गुराखी सुरचंद कोठू पारधी हा वनविभाग अधिकारी यांच्या शोध मोहिमेमुळे जरी सुखरूप घरी पोहोचला असला तरी तो वाघाच्या जबाळ्यातून बचावल्या असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छ. ग. रहांगडाले व त्यांची चमू त्या गुराख्यासाठी देवदूत ठरल्याचेही सांगितले जात आहे.

गुडरी येथील सुरचंद कोठू पारधी हा २० ऑगस्ट रोजी स. १२ वा. गुरे चारण्यासाठी जंगलात गेला होता. बराच वेळ लोटूनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांमध्ये चिंता वाढू लागली. घटनेचे वृत्त तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छ. ग. रहांगडाले यांना मिळताच २० ऑगस्टचे रात्री ८ वाजेपासून छ. ग. रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली नाकातोंडगरी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी रात्रगस्त करून नाकातोंडगरी वनपरिक्षेत्र पिंजून काढले मात्र रात्रीच्या शोध मोहिमेत तो कुठेही सापडला नाही.

२१ ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी ६ वाजेपासून वनकर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली असता शोध मोहिमेत जंगल शिवारातच सुरचंद पारधी भेटला. वनकर्मचाऱ्यांनी विचारपूस केली असता सुरचंद पारधी असल्याची खात्री झाल्यानंतर लगेच त्याला वाहनात बसवून पोलीस पाटील यांच्या सोबतच त्यांच्या घरी सुखरूप पोहोचते करण्यात आले.

दरम्यान गुडरीचे पोलीस पाटील एस. एस. मेश्राम, ग्रामपंचायत सरपंच, तुमसर व नाकातोंडगरी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी तसेच ग्रामवासि उपस्थित होते. सुरचंद पारधी यांनी रात्रभर ज्या जंगल परिसरात वास्तव्य केले त्याच भागात वाघाचे लोकेशन असल्याचे माहिती आहे. असे असतानाही तो सुरक्षितपणे घरी परतल्याने वनविभागाच्या या तातडीच्या शोधमोहिमेचे सर्वत्र कौतुक होत असले तरी सुरचंद पारधी हा मात्र वाघाच्या जबड्यातून बचावला हे येथे उल्लेखित आहे. वन्यजीवांच्या उपस्थितीच्या प्रत्येक घटनेला केवळ भीतीची दृष्टीने न पाहता, वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार जंगलात सुरक्षित वावर ठेवण्याचे आवाहन सुद्धा वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *