‘सँन्डी किचन’ रेस्टॉरंटवर पोलिसांचा छापा

अवैध दारूसह १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- पोलीस स्टेशन जवाहरनगर हद्दीतील कवडसी फाटा येथील प्रसिद्ध ‘सँन्डी किचन अँड रेस्टॉरंट’ वर पोलिसांनी छापा टाकून अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १ लाख १३ हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भंडारा येथील पोहवा. राऊत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कवडसी फाटा येथील सँन्डी किचन अँड रेस्टॉरंटमध्ये कोणताही परवाना नसताना अवैधरित्या विदेशी दारूची विक्री सुरू होती. पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी क्र. १ संदीप सुधाकर चन्ने (वय ३९, रा. राजुरा, जि. चंद्रपूर, ह.मु. सँन्डी किचन कवडसी फाटा) आणि आरोपी क्र. २ मालक संदीप सुरेश कृपाण (वय ४१, रा. गांधी वार्ड शहापूर, ह.मु. सिताराम सिटी भोजापूर) हे दोघे मिळून विविध ब्रँडची एकूण ३७ हजार २९५ रुपये किमतीची विदेशी दारू बाळगतानाळून आले. दारू ठेवण्यासाठी वापरलेली फ्रीज किंमत ७० हजार रुपये आणि लोखंडी कपाट किंमत ६ हजार रुपये असा एकूण १ लाख १३ हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात तिसरा आरोपी सरगम वाईन शॉपी, भंडारा चा मालक मयूरेश अनिल पंचबुद्धे (वय ३०) रा. सहकार नगर भंडारा हा आहे. त्याने त्याच्या वाईन शॉपीमधून कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणात दारूची विक्री/पुरवठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तिन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनात पोहवा. राऊत, पोहवा. बुरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भंडारा यांनी केली असून पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *