कत्तलीसाठी जाणाऱ्या १८ गोवंशाची सुटका
२ आरोपीवर गुन्हा दाखल ; २ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त
दै. लोकजन वृत्तसेवा
सिहोरा :- मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर आणि भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या मुरली ते चांदपूर रस्त्यावर गुरांना क्रूरतेची वागणूक देत आखूड दोराने बांधून वेदना देत कत्तलीसाठी नेण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार विजय कशोधन व त्यांच्या चमूने सापळा रचला व आरोपींना ताब्यात घेऊन १८ गुरांची सुटका करून त्या गुरांची ध्यान फाउंडेशन गौशाळा संस्था गरडा तालुका लाखनी येथे रवानगी करण्यात आली व यातील आरोपी अवधूत उरकुडा मरकाम वय ६३ वर्ष रा. मुरली जिल्हा भंडारा व दिनेश तोडकर वय ४० वर्ष मोहगाव नांदी जिल्हा बालाघाट यांच्यावर अ. क्र. ३६६/२०२६ दि. ८ ऑक्टोबर अन्वये सिहोरा पोलिसात कलम ११ (१) (ए) (एफ) (एच) अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई काल ८ ऑक्टोबर रोजी सा. ४ वाजताचे सुमारास करण्यात आली.
या प्रकरणातील फिर्यादीने पंचा समक्ष मुरली येथे मुरली ते चांदपूर कडे जाणाऱ्या चांदपूर जलाशयावरील कॅनॉल मार्गाच्या बाजूला धाड घातली. कॅनॉलच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे १४ बैल प्रत्येकी किंमत १५ हजार रुपये प्रमाणे २ लाख १० हजार रुपये व लालसर रंगाचे ४ बैल प्रत्येकी किंमत १५ हजार रुपये प्रमाणे ६० हजार रुपये असे एकूण २ लाख ७० हजार रुपये किमतीच्या गुरांना आखूड दोर खंडाने बांधून त्यांना चारा पाण्या विना वेदना व यातना तसेच क्रूरतेची वागणूक देताना मिळून आल्याने आरोपींवर कारवाई करीत १८ जनावरे (बैल) पालन पोषण व सुरक्षिततेसाठी ध्यान फाउंडेशन गौशाळा संस्था गरडा ता. लाखणी येथे रवानगी करण्यात आली असून दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.








