राजेंद्र सपाटे आत्महत्या प्रकरणात पालकमंत्र्यावर गुन्हे दाखल करा

शिवसेना (उ.बा.ठा.) चे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- मोहाडी तालुक्यातील धोप येथील कर्जबाजारी असलेले मयत शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर ३०६ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे ऑफिसर क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

संजय रेहपाडे पुढे म्हणाले, राज्य शासनाने १५ दिवसाअगोदर राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. भंडारा जिल्ह्यातील सुद्धा ७ पैकी भंडारा, पवनी आणि लाखान्‍दूर हे ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. ह्या तीन तालुक्यांसारखीच परिस्थिती जवळजवळ उर्वरित मोहाडी, तुमसर, लाखनी व साकोली तालुक्यातही असताना फक्त तीनच तालुके कोणत्या आधारे दुष्काळग्रस्त घोषित केले. हे कळायला मार्ग नाही. त्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री ना. पंकज भोयर हे आठवडाभरापूर्वी जिल्हा दौऱ्यावर असताना मोहाडी तालुक्यात सुद्धा गेले. त्यावेळी मयत शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांना त्यांची व्यथा बोलून दाखवत त्यांच्या शेतापर्यंत चालण्याची आणि नहराची, शेतीची परिस्थिती पाहण्याची रडतरडत विनवणी केली. परंतु संवेदना हरपलेल्या पालकमंत्र्यांनी ना संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला फोन केला, ना त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचा त्रास घेतला. त्यामुळे आधीच मनातून खचलेले राजेंद्र सपाटे हे अधिकच खचले आणि त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलून विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबिला.

मग पालकमंत्र्यांचा दौरा हा दुष्काळी पाहणी, देखावा होता की शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी होता की केवळ स्टंटबाजी होती? हा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतो. सदर प्रकारावरून महायुती सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे स्पष्ट होते आणि अशा मंत्र्यांमुळे राज्य सरकारची पत कमी होत असून अशा बेजबाबदार मंत्र्यांना त्वरीत मंत्री पदावरून बाजूला करण्याचे सौजन्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असेही रेहपाडे म्हणाले.

त्या दिवशी जर पालकमंत्री यांनी राजेंद्र सपाटे यांना धीर देत अधिकाऱ्याला फोन केला असता, बांधावर गेले असते तर कदाचित सपाटे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले नसते. ज्या अधिकाऱ्याकडे शेताजवळच्या नहरासाठी वारंवार खेट्या घालत होते, जे अधिकारी राजेंद्र सपाटे यांच्या तक्रारीची दखल घेत नव्हते त्या अधिकाऱ्यांवर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येस जबाबदार ठरवून त्यांच्यावर ३०६ कलम अन्वये गुन्हा दाखल करून संवेदना हरपलेल्या पालकमंत्र्याला तात्काळ मंत्रीपदावरून कमी करण्याची आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेना (उ.बा. ठा) केली आहे. राजेंद्र सपाटे यांच्या कुटुंबीयास शासनाने मुलास नोकरी आणि एक करोड रुपयाची आर्थिक मदत त्वरित जाहीर करण्याची मागणी शिवसेना तर्फे पत्रकार परिषदेतून करण्यात आली.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, शहरप्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *