तांदूळ चोरी प्रकरणाला गंभीर वळण; कृउबास सचिवाला अटक

३६१ कट्टे तांदूळ चोरी प्रकरणात संजय पुस्तोडे पोलिसांच्या ताब्यात

साकोलीतील राकेश आगासेचीही अटक, बोलेरो पिकअपसह ऑटो जप्त

दे. लोकजन वृत्तसेवा

साकोली :- लाखांदूर फाट्याजवळील शासकीय धान्य गोदामातून गोरगरिबांच्या वाटपासाठी ठेवलेले ३६१ कट्टे तांदूळ, किंमत ५ लाख ४१ हजार ५०० रुपये, चोरीला गेल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तथा राईस मिल संचालक संजयकुमार भैयालाल पुस्तोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. साकोली येथील राकेश आगासे (३५) यालाही अटक करण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३५ एजे ५१७० आणि ऑटो क्रमांक एमएच ३६ ए ३६१४ अशी वाहने जप्त केली आहेत. चोरीच्या तांदूळ काढाताना गोंदिया सहकार क्षेत्रात खळबळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवासारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीला शासकीय तांदूळ चोरी प्रकरणात अटक झाल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या गटनेमुळे संबंधित धान खरेदी केंद्राच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. तांदूळ मोठा हिस्सा हस्तगत करण्यात आला असून उर्वरित धान्य तसेच आणखी एका वाहनाचा शोध सुरू आहे. तपास पुढे गेल्यास या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तपासातून आणखी नावे उघड होण्याची शक्यता

चोरीच्या तांदूळचा उर्वरित साठा, आणखी एक वाहन आणि या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे. चोरीपासून वाहतूक, साठवणूक आणि संभाव्य विक्रीपर्यंतची साखळी उलगडण्याच्या पोलिसांचा प्रयत्न असून तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

साकोली – लाखांदूर फाट्यावरील शासकीय धान्य गोदामाच्या शटरचे नट-बोल्ट काढून चोरट्यांनी गोदामात प्रवेश केला. गोरगरिबांना वाटप करण्यासाठी ठेवलेले तब्बल ३६१ कट्टे तांदूळ चोरीला गेल्याने शासकीय धान्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी चोरीच्या तांदूळाचा माग काढताना गोंदिया जिल्ह्यातील गिरोला (हेटी) येथील रहिवासी संजयकुमार भैय्यालाल पुस्तोडे यांना ताब्यात घेतले. ते सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असून राईस मिलचे संचालकही आहेत. शासकीय तांदूळाची खरेदी, साठवणूक आणि पुढील विक्रीच्या साखळीत त्यांची भूमिका काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणात पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३५ एजे ५१७० जप्त केली आहे. त्यासोबतच ऑटो क्रमांक एमएच ३६ ए ३६१४ देखील जप्त करण्यात आला आहे. चोरीच्या तांदूळाच्या वाहतूकमीध्ये या वाहनांचा नेमका वापर कसा झाला, याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, आणखी एका वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत.

साकोली निवासी राकेश आगासे (३५) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीसह जप्त वाहनांच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत. चोरीचे उर्वरित धान्य कुठे आहे, त्याची वाहतूक कोणत्या मार्गाने झाली आणि त्यामागे आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

दोन धान खरेदी केंद्राच्या कारभाराशी संबंध

संजय पुस्तोडे हे तालुका शेतकी खरेदी-विक्री समिती, देवरी अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील धान खरेदी केंद्र तसेच मां वैष्णवी बहुउद्देशीय सहकारी संस्था, गिरोला या धान खरेदी केंद्राच्या कामकाजाशी संबंधित असल्याची माहिती आहे. बाजार समितीकडून नियमित वेतन घेत असताना कार्यालयात सातत्याने गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी असल्याचेही समोर आले आहे. आता शासकीय तांदूळ चोरी प्रकरणात अटक झाल्याने संबंधित धान खरेदी केंद्राच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जिल्हा उपनिबंधक काय कारवाई करणार?

संजय पुस्तोडे यांच्या अटकेनंतर आता जिल्हा उपनिबंधक, गोंदिया आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाकडून काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. पोलिस तपासातील निष्कर्ष लागू सेवा निबंधाच्या आधारे विभागीय कारवाई किंवा निलंबनाची प्रक्रिया सुरू होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *