भंडारा जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

चारा प्रथम स्थानिक पशुधनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश; उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला चारा जिल्हाबाहेर वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा व पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पशुधनाचे संगोपन करणे आणि दुभत्या जनावरांना पुरेशा चारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील चारा व्यावसायिक कारणांसाठी तसेच इतर जिल्ह्यात पाठवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

कडबा, तणीस, सुकाचारा, घास वाहतुकीवर निबंध:

जिल्ह्यात उपलब्ध असलेला कडबा, तणीस, सुकाचारा, घास, उसाचे वाडे आदि प्रकारचा चारा अन्य जिल्ह्यात कोणत्याही व्यावसायिक अथवा इतर कारणांसाठी वाहून नेण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चारा उत्पादक, व्यापारी आणि संबंधित संस्थांनी आपल्याकडील चारा प्रथम स्थानिक शेतकरी, पशुपालक आणि गोळाळांना उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

उल्लंघन केल्यास कठोर कारवाई:

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती तसेच संबंधित वाहनांवर चारा जहिससह कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ५८ मधील लागू तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण करणे आणि संभाव्य चारा टंचाईच्या काळात स्थानिक पशुपालकांना चारा उपलब्ध करून देणे हा या निर्णयाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे संबंधित सर्वांनी आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *