मोहगाव तलाव परिसरात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

💥 एक तासानंतर हेलिकॉप्टर गोंदियाकडे रवाना 💥 हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड

दै. लोकजन वृत्तसेवा

करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मौजा मोहगाव, ता. येथील बिसारी तलाव परिसरात आज दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०५ वाजता एका हेलिकॉप्टरचे अचानक इमर्जन्सी लँडिंग झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती अजय शेंडे यांनी फोनद्वारे पोलीस स्टेशन करडी येथे बिसारी तलाव परिसरात एक हेलिकॉप्टर लँड झाले असून ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. अशी माहिती दिली. माहिती मिळताच करडीचे थानेदार सहा. पोलीस निरीक्षक गौरनाथ नागलोट, सहा. पोउपनि फरताडे व इतर अंमलदार घटनास्थलळी दाखल झाले.

घटनास्थळी लाल काळ्या रंगाचे ४०७ जीएक्स कंपनीचे हेलिकॉप्टर आढळле. हेलिकॉप्टरमध्ये पायलट व एक सोबती असे दोन व्यक्ती होते. पायलटला विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव कॅप्टन अनुराग असे सांगितले. सदर हेलिकॉप्टर त्रिवेणी कंपनीचे असून आज रोजी नागपूर येथून रायपूरकडे जात असताना वातावरण खराब झाल्याने व फ्युएल सिग्नल न मिळाल्याने त्यांनी ११:०५ वाजता हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँड केले होते. त्यानंतर कॅप्टन अनुराग यांनी नागपूर कंट्रोलला माहिती देऊन गोंदिया येथे हेलिकॉप्टर लँड करता येईल का याबाबत परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी दुपारी १२:०५ वाजता हेलिकॉप्टर गोंदियाकडे टेक ऑफ केले.

दरम्यान हेलिकॉप्टर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस स्टेशन करडी तर्फे योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला होता.

मोहगाव बुज. येथील ग्रामपंचायत अधिकारी के. एस. पिल्लारे यांनी मोहगाडीचे तहसीलदार यांना याबाबत अहवाल दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *