पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत
भंडारा जिल्ह्यातील २२ हजार ३६५ शेतकरी पात्र, १३७ कोटी कर्जमाफी मिळणार
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१६ ची जिल्ह्यात अंमलबजावणी वेगाने सुरू असून जिल्ह्यातील २२ हजार ३६५ शेतकरी पहिल्या टप्प्यात पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना एकूण १३,७१२.३३ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याचे माहिती जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णय दि. ०२ जून २०२६ अन्वये ही योजना घोषित केली असून दि. १५ जुलै २०२६ च्या शासन निर्णयाने निकषात अंशतः सुधारणा करण्यात आली आहे. या योजनेत दोन घटक आहेत. १) कर्जमाफी : कर्ज वाटप दिनांक ०१/०४/२०१९ ते ३१/०३/ २०२५, थकबाकी दिनांक ३०/ ०९/२०२५, कर्जबाकी दिनांक ३१/०३/२०२६ असणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये दोन लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. २) एकवेळ समझोता योजना : याच कालावधीतील कर्ज असलेल्या परंतु दोन लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत दोन लाखावरील रक्कम स्वतः बँकेत जमा केल्यास त्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. शासनाने सर्व व्यापारी बँकांना पत्र देऊन अनुत्पादित वर्गवारीतील खात्यांना विशिष्ट प्रमाणात सवलत देण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच दि. ०१ जुलै २०२६ रोजी सर्व बँकांना पत्र देऊन दि. ०१ एप्रिल २०२६ नंतर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर व्याजाची आकारणी करू नये, असेही स्पष्ट केले आहे.
पात्र लाभाथ्याना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर संदेश पाठविण्यात येत आहे. तसेच या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व संबंधित बँक शाखेत लावण्यात आल्या आहेत. दि. ३० जुलै पर्यंत जिल्हा बँकेचे १९,५१८ व इतर बँकांचे ७८४ असे एकूण १९,३३२ खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उरवितांचे प्रमाणीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी सहायक निबंधक, शाखा निरीक्षक, गटसचिव यांना प्रत्यक्ष व फोनद्वारे संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी जिल्हा निबंधक विलास देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होते.
३० हजार ५९४ खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड
या योजनेअंतर्गत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २३,६५५ कर्जखाते व राष्ट्रीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकांचे ६,९३९ कर्जखाते असे एकूण ३०,५९४ कर्जखात्यांची माहिती महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी संगणकीय छाननीनंतर पात्र ठरलेल्या यादীত जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २०,३१५ कर्जखाते (रक्कम रु. १२,६३७.६८ लाख) आणि इतर बँकांचे २,०५० कर्जखाते (रक्कम रु. १,०७५.६५ लाख) असे एकूण २२,३६५ लाभार्थी आहेत. उर्वरित व दोन लाखावरील कर्जखाती पुढील याद्यांमध्ये प्रसिद्ध होतील.
ई-केवायसी मोफत, पैशाची मागणी केल्यास कारवाई
शासनाच्या नियमानुसार ई-केवायसी सेवेचे शुल्क महाआयटीकडून थेट सेवा केंद्राच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये. प्रत्येक केंद्रावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, ई-केवायसी सेवा पूर्णतः विनामूल्य आहे’ असा फलक लावणे बंधनकारक आहे. कोणी शुल्क मागितस तक्रार प्राप्त होताच तातडील पडताळणी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिला.








