अवैध रित्या २१ गोवंशाची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला
तुमसर पोलिसांची खापा चौकात कारवाई
१९ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
दैनिक लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- अवैध रित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर तुमसर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २१ बैलांसह १५ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दिनांक २९ जुलै २०२६ रोजी तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार खापा चौकामध्ये नाकाबंदी करीत असताना पहाटे सुमारे ०२.४५ वाजताच्या सुमारास माडगीकडून येणारा काळ्या व पांढऱ्या रंगाचा, आयशर कंपनीचा ०६ टायर असलेला ट्रक क्रमांक के. एल. ६३/ई. ७४८१ हा भरधाव वेगाने येताना दिसला. नाकाबंदीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रक थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन न थांबवता भंडारा रोडने पळ काढला.
संशय आल्याने पोलीस पथकाने तात्काळ पाठलाग करून सदर वाहनाला अडवून चेक केले असता, ट्रकमध्ये जनावरे निर्दयतेने कोंबून भरलेली आढळली. ट्रकमधील लाल रंगाचे ०५ बैल, काळसर पांढऱ्या रंगाचे ०६ बैल आणि पांढऱ्या रंगाचे १० बैल असे एकूण २१ बैल किंमत ४ लाख २० हजार रुपये व आयशर कंपनीचा ट्रक किंमत १५ लाख रुपये असा एकूण १९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी वाहन चालक कोटा प्रेम कुमार, (वय २६, रा. अप्पानबेडु पोस्ट हनुमान जंक्शन, जिल्हा वेस्ट गोदावरी, राज्य आंध्रप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन तुमसर येथे प्राणी संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड) (घ) (च) (झ), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ९ (ब) व मोटर वाहन कायद्याच्या १८४ अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक भंडारा नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली तथा अतिरिक्त कार्यभार तुमसर शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनत पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पो.नि. आघाव, पो.हवा. प्रफुल गावंडे, पो.शि. देवानंद हलमारे, चालक पो.शि. भुमेश्वर पटले, पोलीस स्टेशन तुमसर यांनी केली आहे. या कारवाईमुळे अवैध गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.









