गोंदिया-तिरोडा मार्गावर काळाचा घाला; सहेसपूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा

गोंदिया :- गोंदिया-तिरोडा या बळीच्या राज्यमार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची नोंद झाली आहे. किंडगीपार गावाजवळ इंडिका कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण टक्करमध्ये दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत युवकाचे नाव रवी लिलहारे, रा. सहेसपूर, ता. गोंदिया असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळच्या सुमारास रवी आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या इंडिका कार (क्रमांक ढग ८२१३) ने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला, तर दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

या घटनेची माहिती मिळताच गोंदिया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मृत्यूचा सापळा बनतोय राज्यमार्ग

गोंदिया-तिरोडा हा मार्ग जिल्ह्यातील सर्वात धोकादायक मार्ग म्हणून ओळखला जातो. अरुंद रस्ता, अवजड वाहनांची बडळ, गतिरोधकांचा अभाव आणि रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांच्या मते, या मार्गावर भरधाव वेगावर नियंत्रण नाही.

केवळ वाहनचालकाचा निष्काळजीपणा नव्हे, तर रस्त्याच्या दुरावस्थेलाही प्रशासन तितकेच जबाबदार आहे. आणखी किती रवींना जीव गमवावा लागणार, असा संताप सवाल सहेसपूरवासीयांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *