भंडारा जिल्हा देखरेख सहकारी संस्थेची १७ वी वार्षिक साधारण सभा संपन्न

शेतकरी व सहकार सक्षमीकरणाचा निर्धार
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. भंडारा यांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रॉयल सेलिब्रेशन हॉल येथे संस्थेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या अध्यक्षखाली व मार्गदर्शनारखाली उत्साहात पार पडली. या सभेत अध्यक्ष सुनील फुंडे यांनी सहकार क्षेत्राला अधिक पारदर्शक व आधुनिक बनवण्यासोबतच शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करत ठोस संकल्प मांडले.

अध्यक्ष पदावरून बोलताना व अहवाल सादर करताना त्यांनी संस्थेच्या आर्थिक व प्रशासकीय स्थितीची माहिती दिली. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेकडे ३९९ सभासद असून त्यापैकी ३६८ संस्था या प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत. संस्थेचे वसूल भागभांडवल ३ लाख १५ हजार ६६० रुपये असून एकूण निधी ९ लाख ६८ हजार १५१ रुपये इतका आहे. अहवाल वर्षात व्यवस्थापक मंडळाच्या ६ सभा पार पडल्या असून नागपूर येथील मे. पंकज आर. माहेश्वरी अँड कंपनीकडून संस्थेचे अंकेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सध्या संस्थेच्या माध्यम ८८ गटसचिव कार्यरत आहेत.

अध्यक्ष सुनील फुंडे यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन यंत्रणेशी समन्वय साधण्यावर भर दिला. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी यंत्रणा मजबूत करावी, ‘पॅक्स’ संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी आर्थिक व तांत्रिक मदत मिळवी, कर्ज, विमा व शेतीपूरक व्यवसायांचा समन्वय साधला जावा आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण आयोजित केले जावे, अशा प्रमुख मागण्या त्यांनी शासनाकडे मांडल्या. शेतीसोबतच महिला बचत गट, युवक आणि दुग्धव्यवसाय, पशुपालन, कृषी प्रक्रिया यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देऊन उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याचे आवाहनही अध्यक्ष फुंडे यांनी केले.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून ‘डिजिटल पॅक्स’च्या माध्यमातून कामकाज अधिक जलद व पारदर्शक करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. संस्थेची आर्थिक शिस्त कायम ठेवण्यासाठी वेळेवर कर्जवसुली करणे, थकीत बाकी कमी करणे आणि सभासदांना सन्मानपूर्वक व तत्पर सेवा देणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष फुंडे यांनी स्पष्ट केले. सहकारामध्ये व्यक्तीपेक्षा संस्था आणि संस्थेपेक्षा सभासदांचा विश्वास मोठा असतो, ही भूमिका ठेवून सभासदांनीही वेळेवर कर्जफेड करून आपली जबाबदारी पार पाडावी, असा संदेश त्यांनी दिला.

“शेतकरी हित – सभासद हित – संस्था हित” हा मुख्य संकल्प स्वीकारून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. शेवटी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व उपस्थित सभासद बंधु-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानून सभेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *