लाखनीत पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी:- आगामी श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आज दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस स्टेशन लाखनी येथे तालुकास्तरीय शांतता व जातीय सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन हे होते. बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सर्व विभाग प्रमुखानी आपापल्या विभागाची जबाबदारी निश्चित करून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

मा. पोलीस अधीक्षकानी आपल्या अध्यक्षीय भाषणात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या यामध्ये गणेश मंडळांनी डॉल्बी / डीजे चा वापर करू नये, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अंमली पदार्थांचे सेवन करू नये, अनाधिकृत हालचालींवर विशेष लक्ष ठेवावे, काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ डायल ११२ वर पोलिसांशी संपर्क साधावा, कोणतेही आक्षेपार्ह विधान करू नये, जाती-धर्मात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा व खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये व त्या प्रसारित करू नये. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

कार्यक्रमच्या सुरवातीला व्यापारी असोसिएशन लाखनी तर्फे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली शिवम विसापुरे, जिल्हा परिषद सदस्या मनिषा निंबातें, लाखनी नगरपंचायत नगराध्यक्षा सरिता बसेसंकर, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक व सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक अचल कपूर यांनी केले तर आभार प्रदर्शन थानेदार आशिष गजभिये यांनी केले. बैठकीनंतर मा. पोलीस अधीक्षकानी गणेश मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणांची पाहणी केली. भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन आगामी सण उत्सवदरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *