‘एकता महिला गणेश उत्सव’ मंडळ करडीचा डीजे मुक्त विसर्जनाचा संकल्प
दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- सध्या प्रत्येक गल्लीत वेगवेगळे गणेश मंडळ आणि विसर्जनाच्या वेळी डीजे चा गेंगाट पाहायला मिळत असताना, भंडारा जिल्ह्यातील करडी सारख्या मोठ्या गावात एका मंडळाने शसकीय नियमांचे पालन करीत एकोपा आणि आदर्श निर्माण केला आहे.
करडी गावात एकूण तीन ते चार ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव सजरा केला जातो. त्यापैकी एकता महिला गणेश उत्सव मंडळ, करडी ने यंदा वेगळा आणि स्तुत्य निर्णय घेतला आहे. या मंडळाने विसर्जन मिरवणूक पूर्णपणे डीजे मुक्त ठेवून पारंपरिक भजन आणि ताळाच्या गजरात काढण्याचा संकल्प केला असून याबाबत करडी पोलीस स्टेशनला लेखी अर्ज देऊन शसकीय नियमांचे पालन करण्याची घाही दिली आहे.
पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जात मंडळाच्या अध्यक्षा अमिता हेमराज गाढवे (वय ४८), मंगला दीपक तुमसरे (वय ४०) आणि निशा मोहन बांते (वय ४८) यांनी नमूद केले आहे की, आम्ही दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश जी च्या मूर्तीची स्थापना करणार आहोत. तसेच दि. २६ सप्टेंबर २०२६ ला गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करणार आहोत. यावर्षी आम्ही विसर्जन दरम्यान डी. जे. वाजवणार नाही, आम्ही सर्व महिला मंडळातील स्वाध्यायी भजन-टाळ या माध्यमातून गणपती विसर्जन रैली काढणार आहोत, असे आम्ही लेखी स्वरूपात जाहीर करीत आहोत.’
गावात गटबाजी न ठेवता शासनाच्या ध्वनी प्रदूषण आणि डीजे बंदीच्या नियमांचे पालन करीत भजन दिंडीने विसर्जन करण्याचा निर्णय घेणारे एकता महिला गणेश उत्सव मंडळ हे करडी गावातील पहिले मंडळ ठरले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे करडी गावात एकोपा पाहायला मिळत असून हा निर्णय संपूर्ण तालुक्यात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.
या स्तुत्य निर्णयाचे करडीचे थानेदार गौरक्षनाथ नागलोत् यांनी देखील स्वागत केले असून इतर मंडळांनीही शासकीय नियमांचे पालन करीत डीजे मुक्त उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले जात आहे. महिला मंडळाने घेतलेला हा निर्णय इतर गावांसाठीही आदर्शवत ठरणार आहे.








