बळीराजांनी केला बैलांचा गौरव

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा – जिल्ह्यात शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलाचा पोळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. झडत्यांनी पोळ्याचे मैदान गाजले. तांत्रिक युगात बैलांची संख्या कमी झाली असली तरी गावात आहेत तेवढ्या बैल जोड्यांमुळे बळीराजाने आज ग्रामीण भागात आनंदाची लहर निर्माण झाली होती.

ढोल ताशाच्या गजरात शेतकऱ्यांनी हनुमंताच्या मंदिराच्या समोर किंवा जेथे पोळा भरतो तेथे आणले व झडत्यांच्या सामन्याला सुरुवात झाली. ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी म्हटल्या जाणाऱ्या झडत्यातून सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती विशद होत होती. एक दुसऱ्यावर मात करुन झडतीद्वारे आनंद घेतला गेला. बळीराजांनी आपल्या बैलांचा उत्साहात गौरव केला. असंख्य झडतीनंतर झडती म्हणून एक रांगेत उभे असलेल्या बैलांच्या जोडीची पूजा करण्यात आली. त्यानंतर हनुमानाच्या मंदिरापाशी किंवा गावात ठरविलेल्या ठिकाणी असलेले तोरण तोडल्यानंतर पोळा फुटला. शांत संयमी बैलांच्या जोड्या त्यानंतर सुसाट वेगाने घराच्या दिशेने पळाल्या आणि आपल्या धन्याच्या घरी मानाची पूजा घेतली. बाजार चौक पालोरा येथे बैल पोळा झडत्या म्हणून हाकलण्यात आला. यावेळी गावकरी उपस्थित होते.

पोळा पाहण्यासाठी आलेले नागरिकही बैलाची सजावट पाहून थक्क झाले होते. घरी गेल्यावर जोडीची पूजा करुन बैलजोडीला नवैद्य दाखविले. शेतकरी पोळ्यात एकमेकांना अक्षदांचा टिका कपाळाला लावून आलिंगन देऊन स्नेहभाव प्रकट करण्यात आले.पोळा शहरी भागातील नागरिकासाठी काहीसा निरस ठरला. शहरात बैलांची पूजा करण्यासाठी अनेकांना वाट पाहावी लागली.

लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा अनोखा पवित्रा
लाखांदूर तालुक्यात रयत शेतकरी संघटनेच्यावतीने सरकार विरोधात अनोखा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने बोनस देण्याचे आश्वासन देऊनही बोनस न दिल्याने शेतकऱ्यांच्या पाठीवर ‘शेतकऱ्यांच्या हक्काचा बोनस देण्यात यावा’ यासह इतर मागण्यांचे बॅनर लावले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *