आरटीई २५% प्रवेश नाकारल्याप्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेत वादळी सुनावणी

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तुमसर तालुक्यातील माडगी येथील सिरिनभाई नेत्रावाला स्कूल एसएनएस मध्ये “आरटीई २५%’ अंतर्गत पहिल्या फेरीत निवड झालेल्या ६ विद्यार्थ्यांचे प्रवेश पडताळणी समितीकडून नाकारण्यात आल्याच्या गंभीर प्रकारावर ९ जून मंगळवार रोजी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद भंडारा येथे वादळी सुनावणी पार पडली. स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख मनोज चौबे यांच्या नेतृत्वात पालकांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निर्मला माने यांनी पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना “तुम्ही प्रत्यक्ष पालकांच्या घरापर्यंत जाऊन पडताळणी केली होती का’ असा थेट सवाल केला. मात्र,पडताळणी समितीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने समितीचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला.

यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तुमसरच्या गटशिक्षणाधिकारीअर्चना माटे आणि पडताळणी समितीच्या सदस्यांवर तीव्र आक्रोश व्यक्त केला. शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ करिता आरटीई २५% अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात पहिल्या फेरीत सिरिनभाई नेत्रावाला स्कूल, माडगी येथे ६ गरीब व गरजू विद्यार्थ्यांची निवड झाली होती. मात्र, तुमसर पंचायत समितीच्या पडताळणी समितीने नियमांचे कारण पुढे करत या सहाही विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले होते.

या अन्यायाविरुद्ध तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी ४ जून रोजी (पत्र क्र. ८१/२/ २०२६) शिक्षण विभागाकडे रीतसर अपील दाखल केले होते. तसेच तुमसर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनीही यावर पत्रव्यवहार केला होता. याची दखल घेत शिक्षणाधिकारी निर्मला माने यांनी ९ जून रोजी दुपारी १२ वाजता सर्व संबंधित अधिकारी, पडताळणी समिती आणि पालकांना संपूर्ण कागदपत्रांसह सुनावणीसाठी पाचारण केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *