रेतमाफियांच्या बेफाम धावण्याने ग्राम काटी हादरले; टिप्परमोटारसायकल अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला
दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया : -जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्राम काटी येथे रेतीने भरलेल्या भरधाव टिप्पर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या अपघातात मोटारसायकल चालकासह दोन लहान मुलांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी रात्री सुमारे ८.०० वाजताच्या सुमारास ग्राम काटी येथील मुख्य मार्गावर रेतीने भरलेला एक टिप्पर भरधाव वेगाने जात असताना त्याची मोटारसायकलला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की मोटारसायकलवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले. या अपघातानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.राज्य शासनाने आणि प्रशासनाने अनेक ठिकाणी रेती उत्खनन व वाहतुकीवर निर्बंध घातलेले असताना रेतीने भरलेले टिप्पर रात्रीच्या वेळी खुलेआम कसे धावत आहेत, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अवैध रेती वाहतुकीला कोणाचे संरक्षण आहे, याची चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत रास्ता रोको आणि धरणे आंदोलन केले. अवैध रेती वाहतुकीमुळे गावातील नागरिकांच्या जीविताला सतत धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रेती माफियांच्या कारवायांवर लगाम घालावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र तुरकर यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. “मासूम नागरिकांच्या जीवापेक्षा कोणताही व्यवसाय मोठा असू शकत नाही. अवैध रेती वाहतूक थांबविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकासह संबंधित संचालकांवर कठोर कारवाई व्हावी, तसेच या अवैध व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या घटकांचीही सखोल चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, ग्राम काटीतील या घटनेने जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









