गॅस टँकर चालकाने बाईकस्वाराला चालकाने १०० फूट फरफटत नेले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भरधाव टँकर चालकाने बाईकस्वाराला धडक देवून १०० फूट फरफटत नेल्याची गंभीर घटना भंडारा शहरातील वर्दळीच्या राजीव गांधी चौकात दुपारी ३.२० वाजताच्या दरम्यान घडली. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. मृतकाचे नाव माणिक आसाराम आग्रे (वय ६२, रा. रामटेक, जि. नागपूर) असे असून किरकोळ जखमीचे नाव सेवक भिमराव नागपुरे (वय ४६) रा. रामटेक, जि. नागपूर) असे आहे. या घटनेने चौकात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी ट्रॉन्सपोर्ट कंपनीचा टँकर क्र. एमएच ४६ एएफ ६९२० हा ज्वलनशीन पदार्थ घेवून जात होता. दरम्यान भरधाव असलेल्या ट्रँकरच्या चालकाने मोटारसायकल क्र. एमएच ३६ सीपी ८५१८ च्या चालकाला जोरात धडक मारली.
मोटारसायकल चालक टँकरच्या समोरील चाकाखाली अडकला. टँकर चालकाने मोटारसायकल चालकाला १०० फूट फरफटत नेले. यात मोटारसायकलवरील एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर टँकर चालक टँकर सोडून फरार झाला. घटनेची माहिती होताच वाहतुक नियंत्रण शाखा व पोलीस स्टेशन भंडारा येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती केले. मात्र एकाचा मृत्यू झाला. किरकोळ जखमीला सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले आहे.









