आंघोळ करून परतताना वैनगंगा नदीत बोट उलटली
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- करचखेडा येथील वैनगंगा नदीच्या बेटावर आंघोळीसाठी गेलेल्या सात युवकांची बोट मध्यभागी उलटल्याने दोन जण बुडाले. ही घटना दि. ७ जून रोजी सायंकाळी घडली. यापैकी कृष्णा जगन्नाथ बोकडे (वय २६) याचा मृतदेह ८ जून रोजी सकाळी ११ वाजता सापडला, तर पवन मुरली चौबे (वय ३४) याचा मृतदेह दुपारी ४ वाजताच्या दरम्यान मिळाला. उर्वरित पाच जण कसेबसे पोहत बाहेर आल्याने बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मौजा करचखेडा ता. भंडारा येथील वैनगंगा नदीपात्रात ही घटनाघडली.
कृष्णा जगन्नाथ बोकडे (वय २६, रा. चांदनी चौक), आकाश केवट (वय २७, रा. आंबेडकर वार्ड), सुबोध विलास ढोक (वय २६, रा. सेद्री बुज., ता. पवनी), काशीनाथ फत्तु मेश्राम (वय ३२, रा. जुना करचखेडा), पवन मुरली चौबे (वय ३४, रा. आंबेडकर वार्ड), मृनाल बाळकृष्ण मंदुकर (वय २०, रा. गांधी चौक) व अजर्ुन मोतीराम मेश्राम (वय २९, ह.मु. आंबेडकर वार्ड) असे सात जण खाजगी बोटीने नदीच्या एका किनाऱ्यावरून मधल्या बेटावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. आंघोळ आटोपून सायंकाळी त्याच बोटीने सर्वजण परत येत होते. नदीच्या मध्यभागी आल्यावर अचानक बोटीचा तोल गेला व बोट पलटली. बोटीत असलेले सातही जण पाण्यात पडले. त्यापैकी आकाश केवट, सुबोध ढोक, काशीनाथ मेश्राम, मृनाल मंदुकर व अजर्ुन मेश्राम हे पाच जण पोहण्यात तरबेज असल्याने कसेबसे पोहत किनाऱ्यावर पोहोचले.
मात्र पवन मुरली चौबे व कृष्णा जगन्नाथ बोकडे हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले व बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनीतात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवावी लागली. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जिल्हा शोध व बचाव पथकाला घटनास्थळी पाठविण्यात आले. आज सोमवार ८ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कृष्णा बोकडे यांचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर आढळून आला. तर दुपारी ४ वाजताच्या दरम्यान पवन चौबे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी पोलीस, मृतकांचे नातेवाईक व गावकरी उपस्थित होते.








