वैनगंगा नदीच्या पुलावरील बंद स्थितीत असलेले पथदिवे त्वरित चालू करून खड्डे बुजवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहराजवळून वाहणाऱ्या वैनगेच्या तीरावर साधारणतः २० वर्षांपूर्वी अशोका इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीने पूल बांधलेला होता. हा पूल राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याकारणाने आणि भंडारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे ह्या पुलावरून हल्ली तसेच जड वाहनांची रेलचेल् ही रात्रदिवस असायची आणि कमी प्रमाणात का असेना परंतु ती आजही आहे.

परंतु ह्या पुलावरील पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद स्थितीत असून पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाल्यामुळे वाहतूकदारांना, दुचाकीस्वारांना याचा प्रचंड मनस्ताप होत असल्यामुळे, ह्या समस्या त्वरित मार्गी लाविण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.

सध्याच्या घडीला राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक ही मागील काही महिन्यांपासून शहराबाहेरून वळविली असली तरी आसपासच्या खेड्यातील हजारो लोक कामानिमित्त, रोजगारासाठी रोजच भंडारा शहरात येतात परंतु काम आटोपून घरी जात असतांना ह्या पुलावर मात्र अंधाराचे साम्राज्य तयार झाल्यामुळे सायकलस्वारांना आणि पायी जाणाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होतो. शिवाय पुलावर लहान मोठे खड्डे सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार झालेले आहेत त्यामुळे खास करून दुचाकीस्वारांना याचा प्रबंध त्रास होतो.

जोपर्यंत अशोका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ह्या पुलाचा टोल वाहनधारकांकडून आकारत होती तोपर्यंत ह्या पुलाची देखरेख व्यवस्थित होत होती परंतु जेव्हापासून ह्या कंपनीचे टोल आकारणे बंद झाले तेव्हापासून मात्र ह्या पुलावर समस्यांचा डोंगरच उभा राहत असून पुलाच्या मध्यभागी तर एका ठिकाणी जॉइंट उघडे पडले आहे परंतु राष्ट्रीय महामार्ग विभागाला याचे काहीच देणे-घेणे नाही.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने ह्या पुलावरील पथदिवे त्वरित चालू करून पुलावरील खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्र्यात उभी राहील असा इशारा शिवसेना तर्फे शहर प्रमुख राकेश आंद्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, हिमांशू भाजीपाले, नितेश गभणे, अथर्व समर्थ, राज वधवानी, शामराव मालखंडाळे, संतोष चांदीवार, अतुल मिरासे इ.पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

निवेदनाची उपअभियांता राष्ट्रीय महामार्ग यांना दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *