खराशी येथील अन्न विषबाधा उद्रेक प्रकरणाची आरोग्य सभापती व जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

परिस्थितीचा आढावा घेत आरोग्य विभागाला आवश्यक उपाययोजनांच्या सूचना

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील खराशी व ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे अन्न विषबाधेचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्य सभापती आनंद मलेवार, जिल्हाधिकारी सावन कुमार आणि डॉ. शशिकांत शंभरकर उपसंचालक आरोग्य, सेवा नागपूर मंडळ नागपूर यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उद्रेकाची सद्यस्थिती, बाधित रुग्णांची परिस्थिती, आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा आढावा घेतला.

अन्न विषबाधेच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांनी तातडीने समन्वयाने कार्यवाही करावी, बाधित नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात यावी आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

अन्न विषबाधेच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने बाधित नागरिकांच्या आरोग्याची नियमित तपासणी करावी, लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी आरोग्य संस्थेत दाखल करण्याची व्यवस्था करावी आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यावर भर देण्यात आला. तसेच रुग्णांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक वैद्यकीय मदत वेळेत उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अन्न विषबाधेचा संभाव्य स्रोत शोधणे, संबंधित अन्नपदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेची तपासणी करणे, आवश्यकतेनुसार नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे आणि परिसर स्वच्छता व आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे, याबाबत आरोग्य विभागाने संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

गावात आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करून उलटी, जुलाब, पोटदुखी किंवा इतर संबंधित लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करावी. नव्याने लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळेल, याची खबरदारी घ्यावी. तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी पिणे, ताजे व सुरक्षित अन्न सेवन करणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि संशयास्पद अन्नपदार्थांचे सेवन टाळणे याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आवाहन उद्रेकाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत आरोग्य विभागाने सतर्क राहून परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवावी. संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *