सृष्टी फाऊंडेशन, लाखनी तर्फे लाखनी महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न
फटाका शो आणि रावण दहनाने वेधले लक्ष
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- सृष्टी फाऊंडेशन, लाखनीच्या वतीने लाखनी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त लाखनी येथील समर्थ मैदानावर फटाका शो व रावण दहनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी मंचावर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले, आमदार अविनाश ब्राह्मणकर, सोमदत्त करंजेकर, माजी आमदार सेवक वाघाये, धनंजय तिरपुडे, नगराध्यक्ष सारिका बसेसंकर, मुरमाडीचे सरपंच शेषराव वंजारी, सावरीचे सरपंच सचिन बागडे, सभापती महादेव गायधनी, डॉ. चंद्रकांत निंबार्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना आमदार नाना पटोले म्हणाले, ‘विजयादशमी उत्सव म्हणजे वाईट विचारांचा त्याग करून चांगले गुण आत्मसात करणे हा मुख्य उद्देश आहे. वाईटावर विजय प्राप्त करणे हेच मुख्य उद्दिष्ट ठेवले पाहिजे. समाजात ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत, त्यांना दूर करून चांगले विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.’
याच प्रसंगी विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. दांडिया स्पर्धेत प्रथम पुरस्कार (रु. ५० हजार) एस. के. ग्रुप नागपूर, द्वितीय पुरस्कार (रु. २५ हजार) आराध्य ग्रुप नागपूर, तृतीय पुरस्कार (रु. १५ हजार) रासप्रिया ग्रुप साकोली व चतुर्थ पुरस्कार (रु. १० हजार) माऊली ग्रुप भंडारा यांनी पटकाविला.
रावण दहन, फटाका शो तसेच दांडिया स्पर्धेचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी शहरासह आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात कोणतेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता व वाहतुकीची कोणतीही गैरसोय होऊ दिली नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम बिसापूरे, पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांनी आपल्या संपूर्ण स्टाफसह योग्य नियोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता गिरेपुंजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्पित गुमा, विजय गुरुनानी, महेश गुरुनानी, भोला सचदेव, परवेज अकबानी तसेच सृष्टी फाऊंडेशनच्या सर्व महिला व पुरुष सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.








